प्रलंबित बदल्यांविरोधात कामगार महासंघ झाले आक्रमक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव विभागातील कामगारांच्या बदल्या प्रलंबित असल्याने कामगार महासंघाने विभागीय कार्यालयासमोर मंगळवारी, ८ जुलैपासून साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. मुख्य कार्यालयाच्या परिपत्रकानुसार १५ टक्के बदल्या करण्याचे आदेश असताना आणि बदल्यांसाठीची टक्केवारी शिल्लक असतानाही कामगारांच्या बदल्या केल्या नसल्यामुळे कामगारांना अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.
उपोषणाला कामगार संघटनेने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. हे आंदोलन संघटनेच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही, तर आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल. आंदोलनामुळे औद्योगिक शांतता भंग झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. कामगारांच्या हक्कासाठी आणि प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात येत असल्याचे कामगार महासंघाने म्हटले आहे.