कर्मचाऱ्यांनी विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांना केले मंत्रमुग्ध
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
महावितरणच्या जळगाव परिमंडल व मंडलातील कर्मचाऱ्यांचे ‘स्नेहबंध’ हे कौटुंबिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. ग्राहकांना अविश्रांत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोहळ्यामुळे नवी ऊर्जा मिळाली. हा सोहळा जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळ येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात रंगला. प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता विनोद पाटील, सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, कार्यकारी अभियंता मानसी सुखटनकर उपस्थित होते.
सोहळ्यात कर्मचाऱ्यांनी विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. योगेश गांगुर्डे, ज्योती दुसाने, सुरेश गुरचळ, विशाल आंधळे, योगेश जैस्वाल व अंकिता पांडे यांनी सुमधुर गाणी गायली. महेंद्र महाजन यांनी काव्य वाचन केले. कुडाळ (जि.सिंधुदुर्ग) येथील साई कला मंचाने मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ हा गीतसंगीत नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर केला.
कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, चेतन नंदनवार, शिवाजी चव्हाण, गणेश महाजन, सखाराम थान्वी, प्रणाली विश्लेषक मनोज भराडे, वरिष्ठ व्यवस्थापक अमित सोनवणे, गणेश लिधुरे, व्यवस्थापक तन्वी मोरे यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी, परिमंडलातील कर्मचारी व त्यांच्या परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद घेतला. प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता रत्ना पाटील तर जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी आभार मानले.
