साईमत जळगाव प्रतिनीधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दि. १२ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत महात्मा फुले – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १२ एप्रिल रोजी माजी सनदी अधिकारी ई झेड खोब्रागडे हे ‘फुले आंबेडकरी विचार प्रवाहातील जाणकारांचे सामाजिक दायित्व’ या विषयावरील परिसंवादात बोलणार आहे. दि. १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर आणि त्यानंतर दुपारी डॉ. घन:श्याम थोरात यांचा प्रबोधनपर गीतगायन कार्यक्रम होईल. दि. १४ एप्रिल रोजी सकाळी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मिरवणूक निघेल आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथील दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे ‘आजची तरूण पिढी आणि समाजवास्तव’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
कार्यक्रमांच्या पुर्वतयारीसाठी व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांच्या अध्यक्षतेखाली ३ एप्रिल रोजी बैठक झाली. या कार्यक्रमाच्या समितीचे समन्वयक डॉ. राकेश रामटेके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. रमेश सरदार उपस्थित होते. विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. म.सु. पगारे, राजेंद्र नन्नवरे यांनी मार्गदर्शन केले, डॉ. विजय घोरपडे यांनी आभार मानले. विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेले बौध्द अध्ययन व संशोधन केंद्र, महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्र, डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना आणि फुले, शाहु, आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.