मुंबई : वृत्तसंस्था
उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपल्याकडे बहुमत असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. आणि अशातच शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे पेडणेकरांना ही धमकी आली असून या पत्रावर संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता देखील नमूद करण्यात आला आहे. या पत्राची आपण गांभीर्याने दखल घेतली असून त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींसोबतच आता या धमकी पत्राची देखील चर्चा सुरू झाली आहे.
किशोरी पेडणेकर यांना आलेल्या पत्रात लिहले आहे, ‘मी विजेंद्र म्हात्रे.. जय महाराष्ट्र सायबर कॅफे, महाराष्ट्र बँक, उरणमधून बोलतोय. आत्ता लेखी लिहून पाठवतोय. सरकार पडू दे.. नाही तर तुला जीवे मारू. ते पत्रही मीच पाठवलं होतं. तुला जे करायचं ते कर. उद्धव ठाकरेंना सांग, आमच्या अजित पवारांच्या जिवावर मुख्यमंत्री झाला आहेस. जास्त माज करू नकोस.
दरम्यान, धमकीचे पत्र आल्यानंतर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मी माझ्या घरी होते. दोन पोलिकेचे अधिकाऱ्यांसोबत माझी चर्चा सुरु होती. एक मुलगी पत्र घेऊन आली, पत्र उघडलं, पाहिलं तर निळ्या पेनाने काही लिहल्याचे दिसले. मागे माझं चित्र होते. छोटा एक फोटो क्रॉप केलेला आहे. उरणच्या आमदारांचा आणि त्यांच्या बायकोचा फोटो क्रॉप केलेला आहे. नाव आणि पत्ताही आहे. हा पत्र लिहिणारा दिशाभूल करतोय. असे माथेफिरु समाजात असतील आणि उगाचच धमकावत असतील, तर याची दखल घेतली पाहिजे. आदित्य ठाकरेंनाही धमकी दिली आहे.. असे वाटते महाराष्ट्रात मुघलाई आली आहे. अशा पद्धतीने पत्र आले आहे. मुद्दाम हे कुणीतरी करत आहे. अशा पत्रांना मी घाबरत नाही! पण याची आता दखल घेतली पाहिजे. आता ना.म.जोशी पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. मला जे गार्ड दिले आहेत, ते स्वतः हे पत्र घेऊन गेलेत. आता जरा हे जास्तच व्हायला लागलं.