यशोधाम पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंनी चमक दाखवत संघाला दिला राष्ट्रीय विजेतेपदाचा मान
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :
भारतीय पेसापोलो संघटना आणि पेसापोलो फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ८ डिसेंबरदरम्यान भुसावळ येथील सेंट अलायसेस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झालेल्या १६ व्या पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. देशभरातील विविध राज्यांच्या संघांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने दमदार प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधले.
या राष्ट्रीय स्पर्धेत मलकापूर येथील यशोधाम पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली होती. ध्रुव शरद काळे, रुद्र अनंता महाजन, प्रेम गणेश उज्जैनकर, सिद्धार्थ संदीप तायडे, संस्कार महेंद्र जवरे आणि यश तुषार पाटील या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य दाखवत महाराष्ट्राच्या विजयात महत्त्वपूर्ण हातभार लावला. शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख आणि महाराष्ट्र ज्युनिअर मुलांच्या संघाचे प्रशिक्षक डॉ. प्रफुल्ल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने कठीण प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत राष्ट्रीय विजेतेपदावर नाव कोरले.
यशोधाम पब्लिक स्कूलच्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्रासाठी आणि मलकापूरसाठी गौरवाचा क्षण आला. पुढील मे २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे होणाऱ्या पेसापोलो वर्ल्ड कपसाठी भारताच्या संघात ध्रुव शरद काळे आणि रुद्र अनंता महाजन यांची निवड झाली आहे. ही निवड भारतीय पेसापोलो सिलेक्शन कमिटी प्रमुख डॉ. रमेश राजपूत आणि मारिया मॅडम यांनी केली असून ही निवड शाळेसाठी तसेच संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
या यशाबद्दल शाळेचे संचालक डॉ. वैभव महाजन, प्राचार्या उषा मॅडम, भारतीय पेसापोलो संघटनेचे महासचिव चेतन पागावाड, महाराष्ट्र पेसापोलोचे सहसचिव मेघश्याम शिंदे, अकोला जिल्हा सचिव रामेश्वर राठोड आणि इतर मान्यवरांनी खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा देत भविष्यातील स्पर्धांसाठी प्रोत्साहित केले.
