सावित्रीबाई फुले योजनेत ५ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मासिक शिष्यवृत्ती सुधारित रकमेवर
साईमत/ मुंबई / प्रतिनिधी
राज्यातील अनुसूचित जातीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत रक्कमेची मोठी वाढ करण्यात आली आहे.याअनुसार, ५ वी ते ७ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक २५० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल, तर ८ वी ते १० वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक ४०० रुपये मिळणार आहेत.
सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांनी सांगितले की, सध्याची शिष्यवृत्ती रक्कम तुटपुंजी असल्याची कबुली त्यांनी केली आहे. सध्या ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना ६० रुपये आणि ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना १०० रुपये मासिक दिले जात होते. आता ही रक्कम अनुक्रमे २५० आणि ४०० रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विभागाने तयार केला आहे.
शिरसाट यांनी अधिक माहिती दिली की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रस्ताव मंजूर होईल. यानंतर पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त विभागाकडून अंतिम मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर यावर्षीपासून सुधारित शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना लागू केली जाईल.
या वाढीमुळे राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल आणि शिक्षणात सुधारणा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
