फैजपूर: प्रतिनिधी
सनातन सतपंथ संप्रदाय व वैदिक धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांचे दि. १७ जुलै २२ रोजी मुंबई येथून अमेरिकेला प्रयाण झाले. सतपंथ समुदायात पारिवारिक सलोखा, धार्मिक संस्कार, रूढी परंपरा वृध्दींगत होण्यासाठी अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यात भारतातील सतपंथ समुदायातील मोठ्या संख्येने स्थायिक असलेले अनुयायी गेल्या चार वर्षांपासून जनार्दन हरीजी महाराज यांचे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करीत असतात.
त्याचा लाभ परिवारातील लहान थोरांसह सर्वांना मोठ्या संख्येने होत असतो. यावर्षी तीस दिवसांच्या दौऱ्यात अनुक्रमे दि. १८ जुलै ते २१ जुलै २२ रोजी शिकागो, दि. २२ ते २४ दरम्यान सेंट लुईस, दि. २५ ते २७ नॉर्थ करोलिना, दि. २८ ते ३१ फ्लोरिडा, दि. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट पेंसिल्वानिया, दि. ८ ते ९ ऑगस्ट न्यू जर्सी, दि. १० ते १४ न्यूयॉर्क, दि. १५ ते १६ कनेक्टिक्यूट येथे प्रवचन व सत्संग तसेच टॉक शो विथ जनार्दन महाराज दि. १७ ऑगस्ट २०२२ ला परतीचा प्रवास असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पेंसिलविनिया (न्यूयॉर्क) येथे खास तरुणांसाठी टॉक शो, संवाद सभेचे आयोजन केले आहे. वरील सर्व कार्यक्रम लाईव्ह प्रसारण असल्याने भारतासह जगभरातील असंख्य भाविक भक्त याचा लाभ घेणार असल्याचे महाराजांनी सांगितले. दि. १६ रोजी रात्री १-०० वाजता महाराजांचे भुसावळ येथून मुंबईला प्रयाण झाले.