महादेव, टोकरे कोळी समाजाचा एसटीत समावेशासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या समिती

0
62

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पाऊले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. तसेच महादेव, मल्हार व टोकरे कोळी समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. दरम्यान, या बैठकीला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री गुलाबराव पाटील सहभागी झाले होते.

बैठकीस आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार रमेशदादा पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चिमणराव पाटील, महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, माजी आमदार शिरीष चौधरी, तर दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांकडून दखल

बैठकीला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री गुलाबराव पाटील सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी आदिवासी जात पडताळणी कार्यालय जळगाव येथे स्थलांतरित करावे. कोळी समाजाचे जातीविषयक प्रश्न निकाली काढावेत. महर्षी वाल्मिकी महामंडळाची स्थापना करावी. अशी मागणी केली. उच्च व सर्वोच्च न्यायालयातील विविध निकालांचा विधी व न्याय विभागाकडून मत मागविण्यात यावे. तसेच आदिवासी विभागाच्या कार्यालयातील अधिकारी जळगाव येथेही उपस्थित राहून कामकाज पाहतील, अशी व्यवस्था करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

उपोषण मागे घेण्याबाबत चर्चा

विविध विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतल्यानंतर त्यांनी जळगाव येथे कोळी समाजाचे सुरू असलेली उपोषण मागे घेण्याची आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यावर जळगाव येथे २१ ऑक्टोंबर रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन उपोषणाची सांगता करावी. अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here