पाच जोडप्यांच्या हस्ते अभिषेक, ६ ऑगस्टला कावड यात्रा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील पिंप्राळा भागातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी, २८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता पाच जोडप्यांच्या हस्ते जलाभिषेक, दुग्धाभिषेक पूजा त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी माणिक-कल्पना चौधरी, धनंजय-आशा सोनार, नारायण-माधुरी येवले, समाधान-पूजा ठाकरे, भिकमचंद राठोड, गणेश जाधव, शरद नेवे यांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पंचामृतने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजा करुन महाआरती करण्यात आली. दरम्यान, येत्या ६ ऑगस्ट रोजी मंदिरातून सावखेड्यातील गिरणा नदीपर्यंत कावड यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती नरेश बागडे यांनी दिली.
श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने २८ जुलै रोजी भाविकांनी मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांना केळीसह राजगिऱ्याच्या लाडूचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. सिहोरचे प्रदीप मिश्रा महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे बुधवारी, ६ ऑगस्ट रोजी कावड यात्रा निघणार आहे. त्यानुसार सोनी नगरातून सावखेड्यातील गिरणा नदीपर्यंत कावड यात्रा निघणार आहे.
कावड यात्रेला भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन
शहरातील पिंप्राळा परिसरातील वटूकेश्वर महादेव मंदिर, मयूर कॉलनीतील नर्मदेश्वर महादेव मंदिर, गणपती नगरातील ओंकारेश्वर महादेव मंदिर, ओमकार पार्कमधील ओंमकारेश्वर महादेव मंदिर, सुख अमृत नगरातील अर्ध नारेश्वर महादेव मंदिर अशा विविध ठिकाणाहून भाविक पिंप्राळा भागातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता एकत्र जमतील. त्यानंतर तेथून सावखेडा येथील गिरणा नदीच्या पात्रातून तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करतील. कावड यात्रेला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नरेश बागडे, मधुकर ठाकरे यांनी केले आहे.



