लोहाऱ्याच्या महिलेच्या प्रामाणिकपणाचा संताच्या भूमीत सर्वांना आला प्रत्यय
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
संतांची नगरी चांगदेवला शेकडो भाविकांची रोजच दर्शनासाठी वर्दळ असते. चांगदेव नगरीचे दर्शन झाल्यानंतर दोन नद्यांचा संगम असल्याने निसर्गरम्य देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते. अशातच नदी काठावर निकिता गोपाळ जंजाळ (मु.पो.चिंचपूर, ता.सिल्लोड, जि.छत्रपती संभाजीनगर) ह्या महिलेची सोन्याची मंगलपोत हरविली होती. ती सोन्याची पोत वंदना सुभाष देशमुख (रा.लोहारा) यांना सापडली होती. त्यांच्या मनात कुठलीही लालच न येता त्यांनी ती पोत चांगदेव मंदिर येथील देवस्थानातील पुजारी यांच्याजवळ सुपूर्द केली. ज्यांची असेल त्यांना द्या, असे उदार मनाने त्या महिलेने पुजाऱ्यांना सांगितले. त्यानंतर पुजारीही तेवढेच उदार मनाचे त्यांनीही लागलीच मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वच व्हाॅट्सॲप ग्रुपला त्या सोन्याच्या पोतचा फोटो सेंड करून मोबाईल नंबर दिला होता.
ज्या महिलेची पोत हरवली होती. त्या महिलेपर्यंत हा व्हाॅट्सॲप मेसेज पोहोचला. ही महिला पोत घेण्यासाठी १३ सप्टेंबर रोजी चांगदेव येथील पुजारींशी संपर्क करून तेथे पोहोचली. समस्त गावातील नागरिकांना बोलावून सर्वांसमोर पुजारी यांनी सोन्याच्या पोतची त्या महिलेकडून संपूर्ण माहिती घेऊन ती पोत किती ग्रॅमची असावी? कशी असावी? याबाबत सखोल चौकशी करूनच गावातील जबाबदार व्यक्तीच्या साक्षीने त्यांना त्यांची पोत स्वाधीन केली. यावेळी समस्त ग्रामस्थ, चांगदेव मंदिराचे पुजारी, दिगंबर चौधरी, विनोद महाजन, अतुल पाटील, भागवत चौधरी आदी उपस्थित होते.
महिलेने सर्वांचे मानले आभार
सहा सात ग्रॅमची हरविलेली सोन्याची पोत वंदना सुभाष देशमुख यांना सापडली. त्यांनी ती प्रामाणिकपणे पुजारीकडे स्वाधीन केली. त्यामुळे त्यांचा खरोखरच प्रामाणिकपणा व मोठेपणा हा गौरवास्पद आहे. महिलेने मला सोन्याची पोत देऊन आई मुक्ताईनेच दर्शन दिल्याचा प्रत्यय आला. संताची भूमी असल्यामुळेच ही पोत निकिता गोपाळ जंजाळ यांना परत मिळाली आहे. त्यामुळे निकिता जंजाळ यांनी वंदना देशमुख यांच्यासह सर्वांचे आभार मानले आहेत.