साईमत यावल प्रतिनिधी
यावल नगरपरिषद हद्दीत रस्ते, गटारी, गटारीवरील ढापे, पाणी पुरवठा पाईपलाईन आणि दुरुस्ती व इतर कामे झालेली आहेत व काही कामे सुरूही आहेत. या बांधकामांचा धडाका सुरू आहे रस्ते बांधकामात प्रस्थापित ठेकेदारांच्या नावावर कार्यारंभ आदेश मिळवून काही नवखे कॉन्ट्रॅक्टर कामांच्या बारकाव्यांची काहीच माहिती नसताना मनमानीपणे शासकीय तिजोरीतून लूट करीत असल्याची चर्चा आहे.
राजकीय प्रभावामुळे नवख्यांना कामे मिळत असली तरी कामांचा दर्जा लक्षात घेता अनेक बोगस टेस्ट रिपोर्ट, कामे चांगल्या प्रतीचे असल्याबाबतचे दाखले मिळवून घेत असल्याने याकडे प्रभारी मुख्याधिकारी आणि स्थापत्य अभियंता यांचे दुर्लक्ष होत असून या सर्व भानगडींना प्रभारी मुख्याधिकारी व स्थापत्य अभियंता जबाबदार असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.
यावल नगरपरिषदेत दोन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. प्रशासनावर कोणाचाही वचक नसल्यामुळे ठेकेदारांमार्फत जी कामे होत आहे त्या कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. झालेल्या कामांची सहा महिन्यात, वर्षभरात दुरवस्था होत आहे ठेकेदार यांना संबंधित अधिकारी कामांची प्रत्यक्ष पाहणी न करता बेकायदा दस्तऐवज तयार करून रिपोर्ट देत असल्याने विविध कामांचे बारा वाजले आहेत याला मुख्याधिकारी आणि स्थापत्य अभियंता जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. मुख्याधिकारी व स्थापत्य अभियंता यांनी टेस्ट रिपोर्टबाबत लक्ष केंद्रित करून कायदेशीर काम करायला पाहिजे असे शहरात बोलले जात आहे.
नवखे कॉन्ट्रॅक्टर कोणत्याही पक्षाचे किंवा लोकप्रतिनिधींचे समर्थक असतात रस्त्याचे काम करताना त्यांना पूर्ण आणि पाहिजे त्या प्रमाणात अनुभव नसल्याने आणि बांधकाम साहित्य त्यांच्या जवळ नसल्याने रस्त्याची गुणवत्ता मात्र खड्ड्यात गेली आहे.
विकास कामे कोणाच्या निधीतून कोणत्या विभागामार्फत, किती रकमेचे याबाबतचा फलक कामाच्या ठिकाणी लावला जात नाही. विरोधक, काही समाजसेवक, संघटना प्रत्यक्ष समोर न येता आपले संबंध चांगले ठेवण्याच्या नावाखाली आणि निवडणुकीत मतदानाचा फायदा कसा होईल याकडे लक्ष ठेवून गप्प असल्याने शासनाच्या निधीची लूट होत असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. रस्त्यांची दुरावस्था आणि खड्डे, तंत्रशुध्द नसलेले गतिरोधक संपूर्ण यावलकर उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी , अशी मागणी केली जात आहे.