येवलेवाडी परिसरात बोपदेव घाटाच्या पायथ्याशी लॉजवर कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला
साईमत/ पुणे/न्युज नेटवर्क/:
येवलेवाडी परिसरात बोपदेव घाटाच्या पायथ्याशी लॉजवर राजरोस सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पश्चिम बंगालमधील दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली लॉज मालकासह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
येवलेवाडी – सासवड रोडवर बोपदेव घाट परिसरात ‘हॉटेल साई बालाजी लॉजिंग’ नावाचे लॉज आहे. लॉजचा मालक रवी छोटे गौडा (४६) आणि तेथे काम करणारा सचिन काळे (४०) हे दोघे मिळून आर्थिक फायद्यासाठी परराज्यातील मुलींना वेश्याव्यवसायात ढकलत होते. बाहेरून हे सामान्य लॉज वाटत असले तरी, आत्र हा अवैध धंदा जोरात सुरू होता.
कोंढवा पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना हवालदार अमोल हिरवे यांना खबऱ्यामार्फत पक्की माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे आणि सहाय्यक निरीक्षक अफरोज पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. पोलिसांनी बनावट ग्राहकाला लॉजवर पाठवले. वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच, दबा धरून बसलेल्या पथकाने लॉजवर धाड टाकली. न्यायालयाने आरोपींना १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
