जळगाव : प्रतिनिधी
शिवसेना व शिंदे सेनेतील राजकीय वाद वाढतच चालला आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यात आता थेट पूर्वी दिलेल्या साधनसामग्री काढून घेण्याचे प्रकार सुरू आहे. शिंदे गटाने गेल्या शुक्रवारी रुग्णवाहिका परत घेतल्यानंतर शिवसेनेकडून तातडीने पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली.पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज 27 जुलै रोजी सकालली येथील शिवसेना कार्यालय परिसरात ज्येष्ठ शिवसैनिकांंच्या हस्ते दोन रुग्णवाहिकांचे उत्साहात लोकार्पण करण्यात आले .
याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे,महापौर जयश्रीताई महाजन,महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहापौप कुलभूषण पाटील,माजी महापौर नितीन लढ्ढा, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन,नगरसेवक बंटी जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी …जय भवानी,जय शिवाजी…च्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या तसेच शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली.
गेल्या महिनाभरापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.सर्वत्र केवळ शिवसेना आणि शिंदे सेनेचीच चर्चा सुरू आहे. दररोज या गटातून त्या गटात जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर वर्षभरापूर्वी शिवसेना महानगराला देण्यात आलेली रुग्णवाहिका आमदार पाटील यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी मागवून घेतली.त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजीचा सूर उमटला.
दरम्यान, जळगावातील रुग्णांना शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवेत खंड पडू नये म्हणून शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे यांनी पुढाकार घेत तातडीने पर्यायी व्यवस्था म्हणून एक नव्हे तर दोन रुग्णवाहिकांची व्यवस्था केली.