लिव्ह-इन पार्टनर तरुणीची डोक्यात कूकर घालून हत्या

0
12

बंगळुरु ः

काही महिन्यांपूर्वी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देशभर खळबळ उडवली होती. त्यानंतर मीरारोड परिसरात सरस्वती वैद्यची तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज सानेने निर्घृणपणे हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये लपवून ठेवले होते.आता पुन्हा एक लिव्ह-इन पार्टनर तरुणीच्या हत्येचा प्रकार उघड झाला आहे. २४ वर्षीय तरुणाने त्याच्या समवयीन लिव्ह-इन पार्टनरची कुकरने हत्या केली असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

हा सगळा प्रकार बंगळुरूमध्ये घडला आहे. बंगळुरूच्या साऊथ-ईस्ट डिव्हिजनचे डीसीपी सी. के. बाबा यांनी यासंदर्भात प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी बंगळुरूच्या बेगूर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव वैष्णव असून तरुणीचे नाव देवी आहे.

वैष्णव व देवी हे दोघे केरळचे आहेत. ते शिकायलाही सोबतच होते. गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहात होते. सुरुवातीला सर्वकाही व्यवस्थित चालले होते मात्र गेल्या काही दिवसांपासून वैष्णवला देवीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. देवी त्याची फसवणूक करत असल्याची शंका त्याच्या मनात घर करू लागली. या मुद्यावरून त्या दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.

शनिवारी संध्याकाळी त्यांच्यात याच मुद्यावरून झालेला वाद विकोपाला गेला.रागाच्या भरात वैष्णवने घरातला कूकर देवीच्या डोक्यात घातला. देवीच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होऊ लागला. काही आप्तस्वकीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले खरे पण प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे देवीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

गुन्हा दाखल, तपास सुरू

दरम्यान, मायको लेआऊट पोलीस स्थानकात यासंदर्भात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डीसीपी सी. के. बाबा यांनी दिली आहे तसेच या प्रकरणी वैष्णवला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here