साईमत, नाशिक : प्रतिनिधी
शहरातील मोसम पूल सर्कलजवळ २७ ऑगस्टला टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या अलोक जयस्वाल (वय १२) याचे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
अलोकच्या मृत्यूस प्रशासनाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत शहरातील विविध सामाजिक संघटनांनी बुधवारी (ता. ३०) सायंकाळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करुन मनपा व पोलिस प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला.मोसम पूल सर्कलजवळ टँकरने (एमएच ४१ एयु ५७९७) दुचाकीला (एमएच ४१ बीबी ११६९) पाठीमागून जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार पिंटू विश्वनाथ यादव (वय ३८, रा. बलेसरा, बिहार, हल्ली रा. सोयगाव), बरखा जयस्वाल व त्यांचा पुतण्या अलोक जयस्वाल हे तिघे जबर जखमी झाले. रविवारी (ता.२७) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. यात जखमी बरखा यांचा पाय निकामी झाला. तर तीन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या अलोकचा मृत्यू झाला.
ऐन रक्षाबंधनला मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील बहिणीचा भाऊ हरपल्याने या अपघाताबद्दल संतप्त प्रतिक्रिया होत्या. अलोकच्या मृत्यूची बातमी समजताच सायंकाळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने जमा झाले. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव, क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती उत्सव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्ती गणेशोत्सव आदी उत्सव समित्या, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अलोकला श्रद्धांजली अर्पण करत त्याच्या मृत्यूस कारणीभूत महानगरपालिका व पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधींचा धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त केला. रहदारीच्या नियोजनाअभावी हा बळी गेला. जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आठ दिवसात अवजड वाहनांची बंदी, फलक व नियोजन करण्यात आले नाही तर सर्व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला. धरणे व निषेध आंदोलनात भरत पाटील, राकेश भामरे, विव्ोक वारुळे, हरिप्रसाद गुप्ता, कैलास शर्मा, सुशांत कुलकर्णी, अर्जुन भाटी, गोपाळ सोनवणे, मयूर वांद्रे, अनिल पाटील, किशोर पाटील, शरद पानपाटील, दीपक कदम, श्याम गांगुर्डे, गणेश पाटील, श्याम गवळी आदींसह राजकीय व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.