साईमत, जळगाव : प्रतिनिधी
सन २०१४ पासून शहरात भाजपचे आमदार आहेत. तेव्हापासून आमदारांनी शहराला खड्डयात घातले आहे. आजही शहरवासिय खड्ड्यांमुळे नरकयातना भोगत आहेत. रस्त्याचे प्रश्न मार्गी लागत नाही. महापालिकेला काम करू दिले जात नाही. गटारी, स्ट्रीट लाईट नाही. आमदारांनी कोणतेही एक तरी ठोस काम दाखवावे, असे आव्हान ठाकरे गटाने दिले आहे. पिंप्राळा व हुडको या भागात ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाचे सोमवारी सायंकाळी सभेत रूपांतर झाले, त्यात आमदार सुरेश भोळे यांनाच टार्गेट करण्यात आले.
शिवसेना ठाकरे गटाकडून ‘होऊ द्या चर्चा या कार्यक्रमातून राज्य व केंद्र सरकारच्या करुया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड असे फलक लावून आमदारांना टार्गेट केले जात आहे. जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगराप्रमुख शरद तायडे, गायत्री सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते. भाजपे अच्छे दिनाचे आश्वासन दिले होते ते आले का?, पक्के घरकुल मिळाले का?, अरबी समुद्रात शिवस्मारक झाले का?, महागाई कमी झाली का? असे पक्ष विचारण्यात आले. पाळगाव शहरात आमदारांचे एकही ठोस काम नाही. शहराला खड्डेमुक्त करु असे आश्वासन दिले होते. आता कार्यकाळ संपण्याची वेळ झाली, शहर मुक्त झालेले नाही, उलट या शहराला खड्ड्यात घालण्याचे काम आमदारांनी केले. न झालेल्या कामांचा शुभारंभ केला जात आहे. बॅनरबाजी केली जात आहे, अशी टिका ठाकरे गटाने केली. दोन्ही ठिकाणी झालेल्या सभांना एक हजारापेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते.
