वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करावे : ग्रामस्थांची मागणी
साईमत/नवापूर/प्रतिनिधी :
तालुक्यातील कोठडा शिवारात आणि रायगण परिसरातील शिवम जिनिंगजवळ शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने दहशतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये, विशेषतः शेती कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सकाळी आठ वाजेच्या सुमारास काही शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना कोठडा परिसरातील शिवम जिनिंगजवळ त्यांना अचानक बिबट्या दिसला. बिबट्याच्या पायाचे ठसे परिसरात स्पष्टपणे दिसून आले आहेत. जे बिबट्याच्या नियमित संचारचे द्योतक आहे. त्यामुळे बिबट्याची उपस्थिती केवळ तात्पुरती नाही. तो परिसरातच वावरत असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बिबट्यामुळे शेतीची कामे करणे धोकादायक बनले आहे. दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी आणि शेतमजूर शेतात जायला कचरत आहेत. परिणामी शेतीची कामे खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या शेतात पिकविलेल्या धान्याचे रक्षण करणे, फवारणी करणे किंवा इतर आवश्यक कामे करणे, यामुळे कठीण झाले आहे.
वनविभागाच्या कारवाईकडे लागले लक्ष
वन विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. बिबट्याला लवकरात लवकर पिंजरा लावून जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे. बिबट्याकडून कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वीच वन विभागाने यावर गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. आता यावर वनविभाग काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.