साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथून जवळील शहापुरातील तरुण शेतकरी संदीप प्रकाश राजपूत आणि प्रदीप फत्तेसिंग परदेशी हे त्यांच्या शेतात गट क्रमांक ११३/१ येथे रविवारी, ८ ऑक्टोबर रोजी रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेल्यावर त्यांना शेतात रात्री १० वाजेच्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले. संबंधित वनविभागाने त्वरित दखल घेऊन बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या शेतकरी कापूस वेचणी, मका काढणी व शेतात रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जात आहेत. बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने शहापूर जवळील नाचणखेडा-भीलखेडा परिसरातही थैमान घातले आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याला चांगलेच जखमी केले होते.