बिबट्याने सहावेळा केलेल्या हल्ल्यात आठ जनावरे ठार, वन विभागाचे दुर्लक्ष
साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी :
शेतकऱ्याच्या जवळील खळ्यात बांधलेल्या गोऱ्ह्यावर बिबट्याने हल्ला चढवून त्यात गोऱ्हा जखमी झाला आहे. ही घटना पुनगाव, ता. चोपडा येथे गुरुवार रात्री लहानु जीवराम सोनवणे यांच्या खळ्यात घडली. त्यात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत बिबट्याने सहा वेळा परिसरात हल्ला करून आठ जनावरे ठार केल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
बिबट्याने गुरुवारी रात्री गोऱ्ह्यावर हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना घडत असताना काहीतरी आवाज होत असल्याने गावांना जवळील निवृत्ती जगन्नाथ सोनवणे व रामकृष्ण सुखदेव बाविस्कर यांनी तात्काळ आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने थेट तापी नदीकडे पळ काढला. दरम्यान, याठिकाणी ग्रामस्थ जागी झाल्याने गोऱ्ह्यावर हल्ला झाल्याचे दिसून आले. पुनगाव परिसरात तापीनदी आहे. तापी नदीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या वावरत असतो. त्याने आतापर्यंत सहा वेळा हल्ला करून आठ जनावरे ठार केली आहेत. याबाबत ग्रामस्थ व सरपंच यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकवेळा बिबट्याचा बंदोबस्त्याची मागणी करूनही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. म्हणून शेतकऱ्यांची एवढी जनावरे ठार झाली असून त्यांचे नुकसान झाले आहे. परंतु आता तरी वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुनगाव सरपंच किशोर बाविस्कर यांनी केली आहे.
बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत जनावरांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नामदेव धुडकु सपकाळे यांची एक गाय, राजू एकनाथ कोळी यांची एक म्हैस, हिरामण उत्तम बाविस्कर दोन बैल, एक म्हैस, हरी बाविस्कर एक बैल, विकास लक्ष्मण खांजोडे एक बकरी, निवृत्ती जगन्नाथ सोनवणे एक बैल अशी एकूण आठ जनावरे बिबट्याने ठार केली आहेत. त्यामुळे वन विभागाने तापीनदी परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करून सातपुडा जंगलात किंवा इतरत्र सोडावे, अशी मागणी पुनगाव ग्रामस्थ करीत आहे.