इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगावने मुला-मुलींसाठी राबविला स्तुत्य उपक्रम
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगाव यांच्याकडून आहेर ज्युनियर कॉलेजमधील मुला-मुलींसाठी मेंन्टल हेल्थ केअर दिवसाचे महत्त्व साधून ‘मोठं मोठं व्हायचंय’ विषयावर नुकतेच व्याख्यान घेण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका पल्लवी आहेर, उपमुख्याध्यापिका रत्नमाला सोनगिरे यांनी पीडीसी जुलेखा शुक्ल, डाॅ.सुनिता पवार, डाॅ.चेतना कोतकर, विद्या चित्ते, कल्पना महाजन यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी पीडीसी जुलेखा शुक्ल म्हणाल्या की, आज मी तुमच्यासमोर ‘मोठं मोठं व्हायचंय’ विषयावर बोलण्यासाठी आले आहे. हा विषय ऐकताच तुमच्या मनात नक्कीच अनेक स्वप्नं, आकांक्षा, ध्येय उभे राहिले असतील. मोठं व्हायचंय म्हणजे नेमकं काय? फक्त वयाने मोठं व्हायचंय का? की विचारांनी, कृतीने, कर्तृत्वाने मोठं व्हायचंय? मोठं व्हायचंय म्हणजे फक्त डॉक्टर, इंजिनिअर, वकील व्हायचंय असं नाही. एक चांगला माणूस व्हायचंय. जे आपल्या कुटुंबाची, समाजाची, देशाची जबाबदारी घेईल. जे इतरांना मदत करेल. जे चांगले विचार आणि संस्कार जपेल. तुमच्या सर्वांमध्ये काही ना काही विशेष गुण आहेत. ते ओळखा. त्यांना वाढवा. तुमचे छंद जोपासा. अभ्यासात मेहनत घ्या. नवीन गोष्टी शिका. अनुभवातून धडे घ्या. चांगल्या लोकांचा सहवास करा. आयुष्यात यश आणि अपयश येत राहतात. अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. त्यातून धडा घेऊन पुन्हा उभे राहा. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. जिद्द आणि चिकाटी ठेवा. मग तुम्ही नक्कीच मोठं व्हाल, असे सांगितले.
‘कली उमलतांना’ विषयावर व्याख्यान
डाॅ.चेतना कोतकर यांचे ‘कली उमलतांना’ विषयावर आहेर ज्युनियर कॉलेजमधील मुला- मुलींसाठी व्याख्यान घेण्यात आले. ‘पाळी’ विषयावर बोलतांना त्या म्हणाल्या की, मुलींबरोबर मुलांनी हा विषय ऐकणे खूप गरजेचे आहे. त्यांनी मुलींना पाळीत काय काळजी घ्यावी, आहार काय घ्यावा, यावर मार्गदर्शन केले.