३२ हजाराच्या मुद्देमालासह गावठी कट्टा, काडतूस जप्त
साईमत/न्यूज नेटवर्क/अडावद, ता.चोपडा :
एक जण हातात पिस्तूल घेऊन निर्जनस्थळी गावठी कट्टयाने फायरिंग करीत असतांनाचा व्हीडीओ व्हाट्सॲपवर प्राप्त झाला असल्याची गोपनिय माहिती पो.ह.हरीलाल पाटील यांना २७ जुलै रोजी मिळाली होती. तो अज्ञात व्यक्ती असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, यांनी पीएसआय अनिल जाधव, स.फौ.अतुल वंजारी, पो.ह. हरीलाल पाटील, विष्णु बिऱ्हाडे, हेमंत पाटील, प्रदीप सपकाळे, भारत पाटील, प्रदीप चवरे असे पथक तयार केले होते. दरम्यान, गावठी कट्टा बाळगणाऱ्याला एलसीबीने अटक केली आहे.
पथकाने फायरिंग करणाऱ्या अज्ञाताचा शोध घेतल्यावर तो विशाल राजेंद्र ठाकुर, (रा.इंदिरा नगर, अडावद) असे असल्याचे निष्पन्न केले. त्याने उनपदेवकडे जाणाऱ्या शेतात फायरिंग केल्याची सांगितले. गावठी कट्टा हा रोहन रवींद्र पाटील (रा.लोणी, ता. चोपडा, ह.मु. कोनगाव, भिवंडी, जि.ठाणे) याच्यासोबत खरेदी केल्याचे सांगितले. गावठी कट्टा रोहन पाटीलकडे असल्याचे सांगुन तो कोनगाव येथे गेला असल्याचे सांगितले. त्यानुसार पथक लागलीच कोनगाव येथे पोहचल्यावर रोहन पाटील यास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली.
तेव्हा त्याने गावठी कट्टा हा लोणी, ता. चोपडा येथे लपवून ठेवला असल्याचे सांगितले. त्यावरून पथक हे लोणी येथे जावून आरोपी रोहन रवींद्र पाटील याने सांगितल्याप्रमाणे ३० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा आणि दोन हजार रुपये किमतीचे चार जिवंत काडतूस जप्त केले आहे. त्याच्याविरुध्द अडावद पो.स्टे. ला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अडावदचे सपोनि संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.भरत नाईक करीत आहे.