नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृतीचा अभियानाचा उद्देश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा उत्साहात प्रारंभ झाला आहे. अशा अभियानांतर्गत १३, १४ आणि १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक घर, दुकान, खासगी आस्थापना तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. अशा महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्देश केवळ स्वातंत्र्य दिन साजरा करणे नाही तर नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक तीव्र करणे असणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने त्यात सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आपल्या घरावर आणि आस्थापनांवर राष्ट्रध्वज लावताना राष्ट्रध्वज संहितेतील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ध्वजाचा योग्य सन्मान राखला जावा, यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच, नागरिकांनी ध्वजासोबत आपले छायाचित्र काढून ते harghartiranga.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावे, असेही सूचित केले आहे.
अभियानात सर्वांनी उत्साहाने सहभागी व्हावे
अभियानात सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक कोपरा राष्ट्रभक्तीच्या रंगांनी न्हाऊन निघेल आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणखी दिमाखदार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.