साईमत, जामनेर : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यात ‘आयुष्यमान भव’ मोहिमेचा उपजिल्हा रुग्णालय येथे नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते फीत कापून नुकताच प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत महाजन, डॉ.पल्लवी राऊत, डॉ.वैशाली महाजन, डॉ.नरेश पाटील, डॉ.मनोज पाटील, जळगाव येथील नेत्रविभाग, अस्थी विभाग, मानसोपचार तज्ज्ञ उपस्थित होते. तालुक्यात १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘आयुष्यमान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे.
मोहिमेमध्ये अबाल वृद्धांच्या आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहे. ‘आयुष्यमान आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थींची नोंदणी करून त्यांना आयुष्यमान गोल्डन कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. हे कार्ड असलेल्या लाभार्थींना नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. तीस वर्षावरील नागरिकांची रक्तदाब, रक्तातील साखर, कॅन्सर यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. टीबी व कुष्ठरोग बाबत शिबिरे घेऊन रुग्ण शोधण्याचे काम करण्यात येणार आहे. डोळ्यांची तपासणी तसेच सर्व प्रकारचे ऑपरेशन याअंतर्गत मोफत करण्यात येणार आहेत.
आरबीएसके टीमकडून विशेष मोहीम राबवून सर्व अंगणवाडी व प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुला-मुलींची ३२ प्रकारच्या सामान्य आजाराच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच जल्म जात विकृती किंवा हृदयात छिद्र, किंवा डोळ्यात तिरडेपणा किंवा इतर विकृतीच्या शस्त्रक्रियासाठी मुंबई व पुणे येथे संदर्भित करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत ‘आभा’कार्ड काढण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तसेच मानसिक आरोग्य तपासणीही या कालावधीत करण्यात येणार आहे.
आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन
तालुक्यातील नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा शिबिराच्या ठिकाणी आरोग्य तपासणी करून आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी केले आहे.