रेशनकार्डसाठी दलालांमुळे भूर्दंड, धान्य दुकानांमध्ये काळाबाजार
यावल (प्रतिनिधी)-
तहसील कार्यालयात रेशनकार्डसाठी सामान्यांना दलालांमुळे भुर्दंड सोसावा लागत आहे. मोफत मिळणारे रेशनकार्डसाठी दोन हजार रुपये घेतले जात आहेत. स्वस्त धान्य दुकानदार मिळालेल्या धान्यापैकी निम्मे धान्य साठवून काळ्या बाजारात विकत असल्याच्या गंभीर तक्रारी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सेवा हक्क दिनानिमित्त झालेल्या आढावा बैठकीत मांडल्या.
पंचायत समितीच्या सभागृहात या बैठकीत आमदार सोनवणे यांनी अध्यक्षस्थानावरून तहसीलच्या पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “रेशनकार्ड लाभार्थ्यांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. पिवळे रेशनकार्ड अनेक श्रीमंत लोकांकडे आहेत. ती रद्द करावीत. तहसील कार्यालयात दलालांमार्फत होणारी लूट थांबवावी
आमदार सोनवणे यांनी स्वस्त धान्य दुकानदारांकडून होणाऱ्या काळ्या बाजारावरही गंभीर आरोप केले. त्यांनी तालुका पुरवठा अधिकारी अभिमन्यु चराटे यांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले.
या आढावा बैठकीला तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड (बोरसे), आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.