लाल बावटा शेतमजूर युनियन, भाकपतर्फे तहसिलवर धडकला मोर्चा

0
27

सोयगावला तहसिलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :

भारतीय मजदूर युनियनशी संलग्न असलेल्या लाल बावटा शेतमजूर युनियन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने शुक्रवारी सोयगाव तहसील कार्यालयावर शेतमजूर, ग्रामीण कष्टकरी, निराधार, बेघर व भूमीहीन रोहयो मजूरांचा धडक मोर्चा सोयगावला तहसील कार्यालयावर काढण्यात आला. त्यानंतर तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शहरातील शिवाजी चौकापासून सुरू झालेल्या मोर्चात सोयगाव तालुक्यातील सुमारे ३०० शेतमजूर, रोहयो मजूर, भूमीहीन, गायरान धारक, निराधार, ग्रामीण कष्टकरी स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बदलापूर तसेच पुणे आणि इतर ठिकाणी झालेल्या घटनेचा लाल बावटा शेतमजूर युनियन, भाकपच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला.

मोर्चेकरांनी गायरान जमीनीचे पट्टे नावावर करा, वनजमीनीचे पट्टे नावावर करा, सर्व अतिक्रमणे नियमित करा, रेशनवरील धान्य अदा करा, रेशनच्या बदल्यात पैसे देण्याची पध्दत बंद करा, भिल्ल, तडवींना एसटी प्रमाणपत्रे अदा करा, वृध्दांना तीन हजार पेन्शन द्या, रोहयोचे किमान सातशे रूपये वेतन द्या, घरकुलासाठी पाच लाख रूपये अनुदान द्या, दरमहा दोन हजार रूपये निराधार अनुदान द्या आदी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार शिवाजी थोटे यांना देण्यात आले.

मोर्चाचे नेतृत्व भाकपचे राज्य सहसचिव कॉ.प्रा.राम बाहेती, भाकप सिल्लोड तालुका सचिव कॉ. सय्यद अनिस, लाल बावटा शेतमजूर युनियनचे सिल्लोड तालुकाध्यक्ष पुंजाराम कांबळे, असलम मिर्झा, सोयगावचे तालुकाध्यक्ष प्रताप चव्हाण, त्र्यंबक शेजुळ, अरुण राठोड, शेख रिजवान अबूजर बागवान, शेख अजीम, पांडुरंग गायकवाड, इस्माईल शहा, संतनाम चव्हाण, सुभाष राठोड, दिलीप चव्हाण, सुभाष माळी यांनी नेतृत्व केले. तहसील कार्यालयात मोर्चाचे विसर्जन झाले. यावेळी कॉ. सय्यद अनिस, पुंजाराम कांबळे, त्र्यंबक शेजवळ, संतनाम चव्हाण, राम बाहेती आदींची मनोगत झाली.

पायी संघर्ष दिंडी काढण्याचा निर्णय

कष्टकरी, गायरानधारक, भूमिहिनांना न्याय न मिळाल्यास सोयगाव ते छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी संघर्ष दिंडी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही दिंडी निघणार असल्याचा इशारा कॉ.राम बाहेती, सय्यद अनिस यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here