स्थानिक निवडणुका…वेध राजकीय स्थितीचा…!
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
आगामी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम दिवाळीनंतर जाहीर होईल. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय पक्षातील स्थितीचा ओघवता आढावा घेण्याचा प्रयत्न दै. ‘साईमत’ने ‘स्थानिक संस्था निवडणुका…वेध राजकीय स्थितीचा’ या सदराखाली वृत्तमालिका सुरु केली आहे. याआधी भाजपानंतर शिवसेना शिंदे गट या पक्षाची स्थितीवजा माहिती प्रसिध्द केली तर आजच्या मालिकेत जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान स्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसची जिल्ह्यातील विद्यमान स्थिती पाहता पक्षात जिल्ह्यावर प्रभाव पाडू शकेल, अशा नेत्याचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.
एकेकाळी जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एकछत्री अंमल असलेल्या या पक्षाची स्थिती उजाडलेल्या राजवाड्यासारखी झाल्याचे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. या पक्षाचा गेल्या २०-२५ वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला असता फारच केविलवाणी स्थिती दिसून येते. गेल्या २५ वर्षात एकही लोकसभेची जागा काँग्रेसला जिंकता आलेली नाही. गेल्या २० वर्षात स्वबळावर कोणत्याही मोठ्या संस्थेवर निर्विवाद यश अथवा बहुमत मिळविता आलेले नाही. जिल्हा परिषदेसारख्या जिल्हाव्यापी संस्थेवर २५ वर्षांपासून भाजपचा वरचष्मा राहिला आहे तर जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव मनपात गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकाची एकही जागा जिंकता आलेली नाही. सातत्याने या पक्षाची जिल्ह्याच्या राजकारणात कायमची पिछेहाट सुरु आहे.
सार्वत्रिक विधानसभेच्या २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. परिणामी काँग्रेस ‘आमदार मुक्त’ जळगाव जिल्हा अशी दुर्दैवी स्थिती या पक्षाची आहे. गेल्या २० वर्षात जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांनी-ज्यांनी धुरा सांभाळली, ते पक्षाला उर्जितावस्थेत आणू शकलेले नाही, हे पण एक वास्तव आहे. एकंदर स्थिती पाहता सर्वसामान्य जनतेवर प्रभाव टाकण्यास या पक्षाचे पदाधिकारी अपयशी ठरले आहेत. पक्ष बळकट करण्यासाठी किंवा पक्षाचे कार्यकर्ते वाढविण्यासाठी कोणताही प्रभावी कार्यक्रम राबविला जात असल्याचे जाणवत नाही. अलीकडच्या घडामोडीत जिल्ह्यातील दोन पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या प्रदेश समितीवर महत्त्वाचे पद बहाल केले आहे.
उपाय अन् कार्यक्रमांवर पक्षाचे भविष्य अवलंबून
प्रदेश स्तरावरील पदे ज्यांना मिळाली आहेत, ते पक्ष वाढविण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे अर्थात पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी कोणता उपाय अथवा कार्यक्रम राबविता हे आगामी भविष्यात स्पष्ट होईल. पक्षाची सद्यस्थिती पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून पक्षाचे अस्तित्व अबाधित राखले गेले तरी ती मोठी कामगिरी ठरेल, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.