जामनेरच्या आरोग्य विभागाच्या टीमचा गौरव

0
22

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील हरीनगर तांडा येथे तिसरी मुलगी झाली म्हणून पित्याने तोंडात तंबाखू कोंबून झोळीत टाकून आठ दिवसाच्या चिमुकलीचे प्राण घेतल्याची दुर्दैवी घटना जामनेर आरोग्य विभागाच्या उत्कृष्ट कामकाजामुळे उघड झाली होती. या घटनेची जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्यामार्फत निरोप देऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वाकोद प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कुमावद, आरोग्य सहाय्यिका निर्मला कुमावत, गटप्रवर्तक यमुना चौधरी-पाटील, आशा स्वयंसेविका मंगला जाधव, वाहन चालक विजु पांढरे अशा जामनेरच्या टीमला बोलावून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून स्वतः ‘अग्निपंख’ हे पुस्तक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जळगावचे आ.सुरेश भोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, मानस विकार तज्ज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन उपस्थित होत्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व टीमशी हितगुज करून तालुक्यात “बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम” आणि गरोदर मातांची ए.एन.सी.ट्रेकिंग करून त्यांची देखरेख व करडी नजर ठेवण्याबाबत महिला बालविकास विभाग, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबविण्याच्या सक्त सूचना दिल्या. तसेच कुटूंब कल्याण योजना प्रभावीपणे राबवून दोन अपत्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले. आशा स्वयंसेविका मंगला जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले. कोणतीही समस्या असल्यास केव्हाही संपर्क करण्याच्या सूचना टीमला दिल्या. सर्व टीमला मोटिव्हेशनल व्हिडीओ दाखवून सर्वांचा उत्साह वाढविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here