शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी मंगळ ग्रह मंदिराचा उपक्रम स्तुत्य : अशोक जैन

0
35

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळग्रह मंदिर संस्थानचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. मंगळग्रह सेवा संस्था, तालुका कृषी कार्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळ कृषी जनजागृती रथयात्रेचे उद्घाटन गुरुवारी, १६ मे रोजी जैन हिल्स येथे कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. मंगळ ग्रह मंदिर संस्थानच्यावतीने गत पाच वर्षांपासून कृषी क्षेत्र जागर रथाचे आयोजन करण्यात येत आहे.

यावेळी मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्‍वस्त अनिल अहिरराव, जैन उद्योग समूहाचे मीडिया व्हॉइस प्रेसिडेंट अनिल जोशी, जनसंपर्क अधिकारी किशोर कुलकर्णी, गिरीष कुळकर्णी, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, विनोद कदम, अभियंता संजय पाटील, जी. एस. चौधरी, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, आर. टी. पाटील, एम. जी. पाटील, ए. डी. भदाणे, सुनील गोसावी, निलेश महाजन, रवींद्र बोरसे, विशाल शर्मा, आशिष चौधरी, जे. व्ही. बाविस्कर आदी उपस्थित होते.

सुरुवातीला मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी उपक्रमाचे महत्त्व विशद केले तर मंगळ ग्रह मंदिराचे पुरोहीत प्रसाद भंडारी यांनी रथाचे विधीवत पूजन केले. शेतकऱ्यांच्या जनजागृती रथ उपक्रमांतर्गत अमळनेर तालुक्यातील १५४ गावांसाठीचे नियोजन केले आहे. त्याचे कारण म्हणजे खरीप हंगाम २०२४ पूर्वी शेतकऱ्यांकडून शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठा खरेदी केल्या जातात. त्यात त्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यांची फसवणूक टळावी, जागृती यावी, यासाठी त्यांनी काय काळजी घ्यावी याबाबची शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध, वास्तव माहिती प्राप्त होणार आहे.

मंगळ ग्रह मंदिरामार्फत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी रथ काढतात. रथयात्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो. शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामकाजात ज्ञानाचा वापर करतात. यामुळे त्यांचे नुकसान होणार नाही व उत्पादनही वाढेल. उपक्रमात अमळनेर कृषी विभागानेही मोलाची साथ दिली आहे. पुढच्या वर्षापासून यासोबत शेती आणि शेतकरी तसेच जैन इरिगेशन हे जे अतूट नाते आहे. उपक्रमात जैन इरिगेशनलाही सोबत घ्यावे. शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती व उच्च तंत्रज्ञान ही पोहोचवू. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच माझ्यासाठी मोठे पारितोषिक आहे, असे जैन इरिगेशनचे संस्थापक आमचे वडील भवरलालजी जैन म्हणत होते. सर्व मिळून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करू या, असे मत जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here