साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
राज्य महामार्गावरील भडगाव तालुक्यातील पासर्डी येथील ज्येष्ठ रहिवाश्यावर मोटारसायकलवरील तीन युवकांपैकी एकाने हातावर चाकुने वार केले. युवकांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्येष्ठ नागरिकाने आरडाओरड केल्याने तिघा युवकांनी भडगावच्या दिशेने पळ काढला. त्यामुळे तिघा युवकांचा ज्येष्ठ नागरिकाला लुटण्याचा प्रयत्न फसला आहे. याघटनेमुळे पुन्हा परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
सविस्तर असे की, राज्य महामार्गावरील भडगाव तालुक्यातील पासर्डी येथील रहिवासी दिलीप अर्जुन जगताप (वय ६०) हे रात्रीच्या जेवणानंतर हॉटेलच्या शंभर मीटर अंतरावर शतपावली करत होते. तेव्हा कजगावच्या दिशेने तीन युवक मोटरसायकलने आले. दिलीप जगताप यांच्याजवळ मोटरसायकल थांबवत ‘मोबाइल दे… पैसे दे…’ करत त्यांना धमकाऊ लागले. येथे दारु दुकान कुठे आहे वगैरे करत धमकावत होते. पैसे आणि मोबाइल देण्यास जगताप यांनी नकार देताच अज्ञात तिघांपैकी एकाने जगताप यांच्या हातावर चाकूने वार केला. त्यामुळे जगताप यांनी आरडाओरडा केली. त्यानंतर परिसरातील काही युवक धावत आले. त्यानंतर अज्ञात तिघांनी तेथुन भडगावच्या दिशेने पळ काढला.
ही घटना लगतच्या हॉटेलवरील मुलांना कळताच मुले मोटरसायकलने घटनास्थळी धावून आले. तेथुन इतर काही युवकांनी त्या तिन्ही अज्ञातांचा पाठलाग केला. मात्र, ते रात्री अंधाराचा फायदा घेत पसार झाले होते. याबाबतची माहिती कजगाव पोलीस मदत केंद्रावरील पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र विसपुते यांना कळताच त्यांनी तात्काळ भडगाव पोलीस स्टेशनला घटना कळविली. त्यानंतर कजगाव-भडगाव मार्गावर पोलीस तैनात केले होते. मात्र, अज्ञातांनी मधल्या मार्गाने पळ काढला होता.
पोलीस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलिसाची नियुक्तीची मागणी
कजगाव परिसरात एका मागुन एक घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागत आहे. वेळीच ही गुन्हेगार प्रवृत्ती ठेचून काढणे गरजेचे झाले आहे. मात्र, येथील पोलीस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलिसच नसल्याने खाकीचा धाक संपल्याने गुन्हेगारीत कमालीची वाढ होत आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कजगावच्या पोलीस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलीस नियुक्ती देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी व्यापारी वर्गासह ग्रामस्थांनी केली आहे.