शौर्याचे पाऊल क्रांतीच्या दिशेने’ – पुणे ते दिल्ली सायकल रॅली फत्ते करत
साईमत/जळगाव /प्रतिनिधी
‘शौर्याचे पाऊल क्रांतीच्या दिशेने’ हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘पंतप्रधान सायकल रॅली २०२६’ मध्ये सहभागी होत जळगावच्या कन्येने देशपातळीवर आपली छाप उमटवली आहे. एनसीसी कॅडेट एस.यु.ओ. खुशबू गोसावी हिने पुणे ते नवी दिल्ली हा अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक सायकल प्रवास यशस्वीपणे पूर्ण करत जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या दैदिप्यमान यशानंतर रविवारी शहरातील शिव कॉलनी चौकात खुशबू गोसावीचे नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशे, फुलांची उधळण आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या यशाबद्दल जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते खुशबू गोसावीचा विशेष गौरव करण्यात आला.
एनसीसीच्या या ऐतिहासिक सायकल मोहिमेत खुशबूने जिद्द, शिस्त, सहनशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवले. पुणे ते नवी दिल्ली दरम्यानचा दीर्घ पल्ला पार करताना तिला हवामान, थकवा आणि प्रवासातील अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला; मात्र कोणत्याही अडचणींना न जुमानता तिने आपले ध्येय गाठले. ही मोहीम एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड मानली जात आहे.
खुशबूच्या या अभूतपूर्व कामगिरीचे कौतुक करण्यासाठी शिव कॉलनी चौकात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी नगरसेविका अंकिता पंकज पाटील, सामाजिक कार्यकर्ते पंकज सुरेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक-युवती, तसेच एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते. सर्वांनी एकमताने खुशबूच्या ध्येयवेड्या प्रवासाचे कौतुक केले.
गौरवप्रसंगी आमदार राजूमामा भोळे म्हणाले, “जळगावच्या मुलीने थेट दिल्लीपर्यंत सायकलने प्रवास करून महिला शक्तीचा प्रभावी परिचय करून दिला आहे. तिचे हे यश शहरातील तरुणींना नवी दिशा देणारे असून, जिद्द आणि कष्टाच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.” त्यांनी खुशबूच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी खुशबू गोसावीचा परिवार, शिव कॉलनी परिसरातील ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच एनसीसीचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खुशबूच्या यशाने केवळ जळगावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढवला असून, तिची ही कामगिरी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
