साईमत / पुणे / प्रतिनिधी
खेड तालुक्यातील जैदवाडी गावच्या हद्दीत ३३ वर्षीय तरुणाचा निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील धनंजय मारुती घेवडे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो १६ मार्चपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असतानाच जैदवाडी परिसरात त्याचा मृतदेह सापडला.
प्राथमिक तपासात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून डोक्यावर आणि तोंडावर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी सुकलेल्या रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. तसेच मृतदेहाजवळ त्याची दुचाकीही आढळली आहे.
या घटनेवरून खून अत्यंत नियोजनपूर्वक आणि क्रूरपणे करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. मात्र, हत्येमागील कारण आणि आरोपी अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेची भावना पसरली आहे.
