काकणबर्डी टेकडीवर चंपाषष्टीला भरते खंडोबाची यात्रा
आबा सुर्यवंशी/पाचोरा
हिवाळ्यात मार्गशिर्ष महिन्यात कार्तिकी एकादशीला पाचोरा नगरीचा सुप्रसिद्ध बालाजी रथोत्सव साजरा होतो. नंतर शहरा पासून दोन ते तीन कि.मी.अंतरावरील गिरड रस्त्यावर असलेल्या काकणबर्डी टेकडीवर चंपाषष्टीला खंडोबा यात्रा भरते. त्यानंतर तालुक्यातील गोराडखेडा येथे अमावस्येला जालंधर-जलालशा उरूस, सावखेडा येथे पाच रविवारी भैरवनाथ यात्रा, कुरंगी जवळील मायजीदेवी यात्रा, सामनेर येथील देवीयात्रा, खेडगाव (नंदीचे) येथे नंदीयात्रा, वडगांव (आंबे) येथील दुर्गादेवी यात्रासह तालुक्याच्या खेडोपाडी अनेक गावांमध्ये प्रथा व परंपरेने चालत आलेल्या नवसाला पावणाऱ्या देव-देवींच्या वार्षिक यात्रा भरायला सुरुवात होते.
काकणबर्डी देवस्थानाला पौराणिक आधार
पाचोरा शहरापासून अवघ्या २ ते ३ कि.मी.अंतरावर व गिरड रस्त्याच्या कडेला उत्तरेस असलेल्या टेकडीवर पौराणिक कथेचा आधार असलेल्या व महादेवाच्या अनेक अवतारांपैकी खंडोबा अवताराचे मंदिर आहे. अख्यायिकेनुसार याच टेकडीवर खंडोबाने केलेल्या दुसर्या विवाहाचे हाताचे काकण सोडले होते अशी अख्यायिका आहे. त्यामुळे टेकडीला काकणबर्डी असे नाव पडल्याची कथा प्रचलित झाली. मार्गशीर्ष महिन्यात चंपाचष्टीला येथे भरणाऱ्या यात्रेपुर्वी भाविकांकडून मंदिरास रंगरंगोटी, रोषणाई करण्यात येते. झेंडूच्या फुलांनी मंदिराला सजावट केली जाते.
यात्रेस शेकडो वर्षांची परंपरा
काकणबर्डी देवस्थान परिसराह जिल्हयात व राज्यात असलेल्या मल्हार भक्तांचे श्रद्धास्थान आहे. पौष महिन्यातील चंपासष्टीला या यात्रेला राज्यभरातून भाविक दर्शनास येतात. तसेच काकणबर्डी यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पुर्वी टेकडीवर लहानसे पुरातन मंदिर होते. भाविकांनी आतापर्यंत श्रद्धेतून या मंदिराचा तीन वेळा जिर्णोद्धार केला आहे. त्यानंतरही दानशुरांच्या व भाविकांच्या योगदानातून मंदिराच्या बांधकामात बदल करून सभागृह असलेल्या मंदिर साकारण्यात आले. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत धार्मिक स्थळांच्या विकास निधीतून टेकडीवर चढण्यासाठी पायर्या व भाविकांच्या सोयीसाठी भक्त निवास तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सोय अलिकडच्या काळात करण्यात आली आहे. यात्रेव्यतिरिक्त दर रविवारी येथे भाविक दर्शनास येतात.
हळदीचा भंडारा, भरीत भाकरीचा नैवेद्य
खंडोबास हळदीचा भंडारा व खोबरे उधळून पुजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी घराघरात विधीवत पूजा करतांना पाटावर तबकात गहू त्यावर तांब्याचा कलश, पाच पाने त्यापैकी तीन पानावर तांब्याच्या अथवा चांदीच्या खंडोबाच्या घोड्यावरच्या अवताराच्या प्रतिमा ठेवून बेल भंडार उधळून सदानंदाचा येळकोटाचा गजर करून बाजरीची भाकर, कांद्याची पात टाकून केलेले वांग्याच्या भरताचा नैवेद्य देण्याची प्रथा असून हळद-खोबरे उधळून खंडोबाच्या गजरात तळी उचलली जाते.
काकणबर्डीला यात्रेचे स्वरूप
काकणबर्डीवर खंडोबाच्या दर्शनास तालुक्यासह जिल्हाभरातून व राज्यातून सर्वच स्तरातील व समाजाचे लहान मोठे, बाल गोपाळ, स्त्री-पुरुष हजेरी लावतात. टेकडीसह परिसरात खेळणी, पाळणे, हलवाईच्या हॉटेल्स, रसवंती, दुकाने थाटली जातात. तसेच भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय व व्यवस्था शहरातील सामाजिक मंडळाकडून केली जाते. यात्रेत शेव-मुरमरे, गुळाची जिलेबी व रेवड्या या खाद्य पदार्थांसह खंडोबावर उधळण्यासाठी हळद व खोबरा, झेंडूच्या फुलांच्या माळांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. यात्रेच्या दिवशी सर्वत्र उत्साह असतो भाविक सदानंदाचा येळकोट व जय मल्हारच्या गजरात काकणबर्डी चढून खंडोबाचे दर्शन घेतात या ठिकाणी शहरातील दानशूर व्यक्तींच्या योगदानातून व स्वखर्चातून वृक्ष लागवड व झाडांचे संवर्धन व पर्यावरण वाढीचे कार्य करीत आहे. सद्यस्थितीला टेकडी हिरव्यागार झाडांनी विलोभनीय दिसते. तर सालाबादा नुसार आर्टिस्ट लक्ष्मण सुर्यवंशी हे मंदिरातील मुर्त्या रंगवितात.
कालानुरूप टेकडीच्या परिसरात होतोय बदल
काकणबर्डी देवस्थानाची महिमा आणि महती दिवसेंदिवस वाढत असल्याने या पुरातन देवस्थानांवर यात्रा आणि दर रविवार नंतर आता दररोज मल्हार भक्त दर्शनाला येऊ लागले आहे. रविवार हा खंडोबाचा वर मानला जात असल्याने टेकडी परिसरात दर रविवारी दाळबट्टी आणि बोकडांचे कबूल केलेले नवस फेडण्याची गर्दि पहायला मिळते. तसेच भाविकांची दररोजची वर्दळ पाहता आता या परिसरात पूजा-साहित्य विक्रीची आणि लहान-मोठी हॉटेल, रिसॉर्ट व इतर दुकाने वाढू लागली आहे.
आ.किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून काकणबर्डी परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी
पौराणिक, आध्यत्मिक आधारातून निर्मिती झालेल्या पुरातन देवस्थानाचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी भाविकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. काकणबर्डी हे पुरातन देवस्थान जेजुर-चंदनपूर, पालीचा खंडोबा तसेच महाराष्ट्रातील अनेक खंडोबाची देवस्थान ज्याप्रमाणे नावारूपाला व प्रसिध्द आहे. त्याच धर्तीवर काकणबर्डी देवस्थानाचे महत्व ओळखून पाचोरा- भडगांव मतदार संघाचे कार्यसम्राट आ.किशोर पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून काकणबर्डी देवस्थानाचे नावीन्यपूर्ण बांधकाम आणि परिसर विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या धार्मिक क्षेत्रविकास निधीतून मागील वर्षात पाच कोटींचा भरघोस निधी मंजूर करून दिला आहे.
पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येणार
निधीतून भव्य प्रवेशद्वार, मंदिरासमोर सभामंडप, भाविकांना मंदिरात चढण्यासाठी एका बाजूने पायऱ्या असून टेकडीवरून दर्शन घेतल्या नंतर उतरण्यासाठी दुसऱ्या बाजूने स्वतंत्र पायऱ्या तसेच दर रविवारी दर्शनासाठी येणारे भाविक, सहल म्हणून येणारे विद्यार्थी यांना बसण्यासाठी ठिकठिकाणी कठडे, पिण्याच्या पाण्यासाठी टाकी, विजेची व्यवस्था, लहान-मोठे, शाळकरी, तरुण, तरुणींना मनोरंजनसाठी सेल्फी पॉइंट, लहान व्यावसायिकांना दुकाने अशी विविध विकास कामे करण्यात येत आहे. या परिसराचा विकास होत असल्याने भविष्यात काकणबर्डी देवस्थान धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येणार आहे.