डॉ. कुंदन फेगडेंनी युवकांना केले लोकल कलेकडे वळण्याचे आवाहन
साईमत/यावल/प्रतिनिधी
आजच्या पिढीतील युवकांना कलाक्षेत्रात प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळण्यासाठी आश्रय फाउंडेशनच्यावतीने आणि अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या संकल्पनेतून खान्देशी अहिराणी सुपरस्टार्सचा ‘खान्देशी धमाका’ कार्यक्रम नुकताच यावल येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला.यावेळी खान्देशी सुपरस्टार्सला बघण्यासाठी यावल परिसरातून गर्दी जमली होती.
कार्यक्रमाला खान्देशी सुपरस्टार सचिन कुमावत, आबासाहेब चौधरी, पुष्पाताई ठाकूर, भैय्या मोरे, मेघा मुसळे, प्रशांत देसले, धिरज चौधरी, अशोक वानरसे, दीपक देवराज, कावेरी पाटील, विनोद कुमावत आणि विलास वाघ यांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमाचा नागरिक, युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्योगपती कै. रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व खान्देशी लोककलावंतांचा सत्कार डॉ. कुंदन फेगडे यांनी केला. आयोजनास सहकार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे त्यांनी जाहीर आभार मानले. आताच्या युवकांनी लोकल कलांकडे जास्तीत जास्त संख्येने वळायला पाहिजे, असे डॉ.कुंदन फेगडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, यावल परिसरातील नागरिक, युवक आणि महिला उपस्थित होते.