साईमत, चोपडा : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवाराने केलेल्या खर्चांवर लक्ष ठेवा. तसेच उमेदवाराने आयोजित केलेल्या सभा आणि रॅलीत कोठे आणि किती खर्च होत आहे, यावर नजर ठेवा. यासाठी सभांमध्ये व्हिडिओ कॅमेरा नेऊन त्याचे चित्रीकरण करा, तसा अहवाल सादर करा, अशा सूचना रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक संदीपन खान यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
चोपडा तहसील कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांच्यासोबत सहाय्यक खर्च निरीक्षक अशोककुमार शर्मा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश वाघ, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे यांच्यासह व्हिडिओ सर्विलन्स टीम, व्हिडिओ व्हीविंग टीम, फ्लार्इंग स्कॉड टीम, स्टॅटिक्स सर्व्हिलंस टीम, मीडिया कक्षाचे नोडल अधिकारी तथा सहाय्यक उपस्थित होते.
आढावा बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षकांनी निवडणुकीबाबत मतदारसंघात उमेदवारांनी केलेल्या खर्चांवर कसे लक्ष ठेवावे? कोणकोणत्या गोष्टींची नोंद घ्यावी? आंतरराज्य चेकपोस्टवर कशी तपासणी करावी? याबाबत अधिक मार्गदर्शन केले. उमेदवाराने बँकेत स्वतंत्ररित्या उघडलेल्या खात्यावर लक्ष ठेवावे. उमेदवाराने मोठ्या प्रमाणावर कोणती खरेदी केली यावरही लक्ष ठेवून त्याबाबतचा दैनंदिन अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याच्या सूचना नोडल अधिकारी आणि सहाय्यकांना देण्यात आल्या. निवडणूक काळात कर्तव्य पार पाडत असतानाच सर्व कर्मचाऱ्यांनी वाढत्या तापमानाचा विचार करून आपले आरोग्य सांभाळण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.