केसीईच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे आज नामकरण

0
5

साईमत जळगाव प्रतिनिधी

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा नामकरण समारंभ आज गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे. या महाविद्यालयाचे नाव “व. पु. होले शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय” असे राहील, अशी माहिती प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यास के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांचे सहकार्य लाभत आहे, असेही त्यांनी सांगितले.

ही पत्रकार परिषद बुधवारी दुपारी महाविद्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये झाली. नामकरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून एन.सी.टी.ई. वेस्टर्न रिजनल कमिटी (नवी दिल्ली) चे सदस्य आणि यवतमाळ येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहासकुमार आर.पाटील राहतील. प्रा. वसंतराव पुरुषोत्तम होले आणि रजनी वसंतराव होले या सत्कारमूर्ती आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू व्ही.एल. माहेश्वरी राहतील, असेही संस्थेचे प्राचार्य राणे यांनी सांगितले. तसेच त्यांनी संस्थेच्या वाढत्या विस्ताराची माहिती दिली.
पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ. अशोक राणे, शारीरिक शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.निलेश जोशी, डॉ.केतन चौधरी आदी उपस्थित होते.

प्रा. व. पु.होले यांच्या कार्याची माहिती

साहित्यिक व सेवानिवृत्त प्रा. व. पु.होले हे सावदा येथील ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. त्यांनी ३५ वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले. ते एन.सी.सी.चे माजी अधिकारी आहेत. के.सी. ई.सोसायटीचे सदस्य व एज्युकेशन युनियन जळगावचे सचिव म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यांनी स्वलिखित कथाकथनाचे १२०५ कार्यक्रम यशस्वीरीत्या केले. विविध दैनिक, वृत्तपत्रात अनेक विषयांवर स्तंभ लेखनही केले. त्यांनी समाजातील अनिष्ठ, वाईट, कालबाह्य रूढी, परंपरा, अंधश्रद्धेवर प्रहार केला. त्यांनी अनेक गरीब, गरजू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन केले. ते उत्तम व्याख्याते असून अनेक नाटकांमध्ये स्वतः भूमिका, नाट्य दिग्दर्शन केले. खान्देशातील खाद्यसंस्कृती, सण, उत्सवांबाबत लेखन केले. त्यांचे पाणी आडवा, पाणी जिरवा, वृक्षारोपण, अध्यात्मिक क्षेत्रातील मोठे कार्य आहे. या अत्यंत निर्मळ, निस्वार्थी, निश्र्चयी, व्यक्तिमत्त्वाने व्रतस्थ भावनेने समाजाला देण्याचा वसा जोपासला आहे. त्यांच्या या व्यापक कार्याला त्यांची सहचारिणी रजनी होले यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here