साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शाहूनगर परिसरातील कथ्थक नृत्यगुरू संजय भिमराव पवार यांना नाशिक येथील राष्ट्रीय ‘कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. राष्ट्रीय कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान सोहळा येत्या रविवारी, १० सप्टेंबर रोजी नाशिक येथील कालिदास कला मंदिरात सकाळी ११.३० वाजता होणार आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय पवार यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
संजय पवार यांनी शहरात कथ्थक नृत्य क्षेत्रात पायल संगीत नृत्यालयाची स्थापना करुन गेल्या ४० वर्षांपासून अनेक विद्यार्थी व विद्यार्थिंनी घडविले आहेत. कथ्थक नृत्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.