रावेर लोकसभा मतदार संघात काट्याची लढत होणार

0
24

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

रावेर लोकसभा मतदार संघात जळगाव जिल्ह्यातील पाच व बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघांचा समावेश केला आहे. गेल्या १० वर्षापासून भाजपच्या उमेदवार रक्षाताई खडसे ह्या विद्यमान खासदार आहेत. नक्कीच यामुळे मतदार संघात भाजपचे पारडे जड मानले जात आहे. लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे शिरीष चौधरी हे एकमेव विधानसभेचे आमदार आहेत. राज्यात तुलनेने मोठा असलेला हा मतदासंघ असून महायुतीकडे ग्रामपंचायतपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था ह्या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे रावेर मतदार संघावर कायमच भाजपचे वर्चस्व दिसून आले आहे. रावेर लोकसभा मतदार संघात यंदाच्या निवडणुकीत काट्याची लढत होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ‘तुतारी’ की ‘कमळ’ कोण बाजी मारणार…? त्याची उत्सुकता यंदा मतदारांमध्ये असणार आहे.

महाविकास आघाडीकडून यंदा प्रथमच मतदार संघात श्रीराम पाटील एक उद्योजक उमेदवारी करीत आहेत. श्रीराम पाटील हे नवखे उमेदवार असले तरी त्यांचा परिचय रावेर लोकसभा मतदार संघात नक्कीच आहे. त्यातल्या त्यात त्यांनी अनेक तरुणांच्या हाताला काम दिले असल्याचे मतदार संघात सांगितले जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपवाशी झालेले श्रीराम पाटील यांना शरद पवार यांनी लोकसभेचे तिकीट देऊन आपल्याकडे खेचून आणले आहे. त्यामुळे सतत पक्ष बदलाचा फटका त्यांना बसू शकतो का? हेही पाहणे औचित्याचे ठरणार आहे. त्याचे भांडवल मात्र प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून होतांना दिसून येत आहे.

गेल्या १० वर्षापासून रक्षाताई खडसे ह्या रावेर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. गेल्या दोन्ही वेळेस माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे यांचे भक्कम पाठबळ त्यांना मिळाले होते. यावेळेस एकनाथ खडसे यांचे पाठबळ त्यांना मिळत असले तरी खडसे कुटुंबियांच्या राजकीय जीवनात प्रचंड उलथापालथी झाल्या असल्याचे महाराष्ट्राने बघितले आहे. त्यातल्या त्यात ते रक्षाताई खडसे यांच्या प्रचाराला लागले असले तरी त्यांच्या कन्या ॲड.रोहिणीताई खडसे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे म्हणजेच श्रीराम पाटील यांच्या प्रचार कार्यात सक्रीय सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. एकनाथ खडसे यांचा अजूनही भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झालेला नाही. केंद्रीय नेतृत्वामार्फत त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे त्यांनी खुद्द सांगितले आहे. स्थानिक भाजपच्या नेत्यांनी मात्र खडसे यांच्या प्रवेशाकडे पाठ फिरवली असल्याचे व उघड कोणीही बोलत नसल्याचे चित्र सध्या भाजपच्या गोटात दिसून येत आहे. भाजपचे संकट मोचक मंत्री गिरीष महाजन यांचे जळगाव जिल्ह्यात गेल्या १० वर्षापासून वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे ना. गिरीष महाजन हे त्यांच्या हिमतीवरही रावेर लोकसभेची जागा निवडून आणू शकतील, अशी चर्चा जामनेर विधानसभा क्षेत्रात चर्चिली जात आहे.

मतदार संघात कुऱ्हाड महसूल मंडळाचा समावेश

रावेर लोकसभा मतदार संघात सर्वाधिक रचनेने मोठा असलेला जामनेर मतदार संघ आहे. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड महसूल मंडळाचा यात समावेश आहे. राज्याचे मंत्री तथा आ.गिरीष महाजन यांची एक हाती सत्ता मतदार संघात आहे. त्यामुळे जामनेर विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक मताधिक्य रक्षा खडसे यांना मिळणार असल्याचे मत भाजप नेते व कार्यकर्ते व्यक्त करतांना दिसून येत आहेत.

काट्यासह तुल्यबळ लढत ठरणार…!

मतदार संघात जातीय समीकरणाचा विचार केल्यास लेवा पाटीदार समाजाची एक गठ्ठा मते रक्षाताई खडसे यांना मिळू शकतात तर मराठा समाजाची एक गठ्ठा मते श्रीराम पाटील यांच्या पारड्यात पडल्यास ही लढत तुल्यबळ होऊ शकते. मात्र, आजपर्यंतचा मतदार संघाचा इतिहास बघता मराठा समाजाची एक गठ्ठा मते कोणत्याच उमेदवाराला पडल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे रक्षा खडसे यांची बाजू वरचढ असली तरी ही लढत काट्याची व तितकीच तुल्यबळ ठरू शकते. त्यातल्या त्यात मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभा केला असल्याने तो उमेदवार किती मते घेतो, यावर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे म्हणजेच श्रीराम पाटील यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. येत्या १३ तारखेला मतदार राजा कोणाच्या पारड्यात बहुमूल्य मत टाकतो, ते दिसून येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here