‘Kartik Purnima Festival’ : केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात ४ नोव्हेंबरपासून ‘कार्तिक पौर्णिमा उत्सव’

0
4

मंदिरात ट्रस्टतर्फे उत्सवासाठी तयारीला वेग

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

शहरातील निवृत्ती नगरातील केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाचा शुभारंभ शुक्रवार, ४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३७ वाजता होणार आहे. उत्सवासाठी मंदिरात जोरात तयारी सुरू आहे. भाविकांना मंदिर दर्शनासाठी ४ नोव्हेंबर रात्री ९.३७ पासून ते ०७ नोव्हेंबर सकाळी ६.५२ वाजेपर्यंत प्रवेश मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव अयप्पा स्वामी मंदिर आहे. येथे प्राणप्रतिष्ठा पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने केली आहे. प्रत्येकवर्षी कार्तिक पौर्णिमेचा शुभमुहूर्त केरळमधील गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली निश्चित केला जातो, ही मंदिराची खास परंपरा आहे.

यावर्षी पौर्णिमा व कृतिका नक्षत्राचा योग आहे. पौर्णिमा ४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३७ पासून ते ५ नोव्हेंबर सायंकाळी ७.२० पर्यंत आहे. कृतिका नक्षत्र ६ नोव्हेंबर सकाळी ८.३२ पासून सुरू होवून ७ नोव्हेंबर सकाळी ६.५२ वाजेपर्यंत राहील, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. या कालावधीत शहरातील मान्यवरांच्या हस्ते विविध पूजा आणि अभिषेक विधी पार पडणार आहेत. मंदिरात महाबलीपुरम (तामिळनाडू) येथून मंगवलेली कार्तिकस्वामीची मूर्ती, तसेच कोटायम तंथनम प्रतिकृती, मथुराई मिनाक्षी देवी आणि गुरूवायुर श्री विष्णू यांच्या मूर्ती विराजमान आहेत. सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा जानेवारी २००० मध्ये तामिळनाडू येथील गुरूजींच्या हस्ते पार पडली होती. भाविकांकडून धन, सोने आणि चांदी या तीन प्रकारच्या अभिषेकांसाठी चिल्लर पैसे गोळा केले जातात. चेन्नईहून मागविलेल्या १०८ नाण्यांद्वारे सोने-चांदी अभिषेक केला जातो. या काळात दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते, म्हणून हजारो भाविक नवस फेडण्यासाठी येथे येतात. हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.

भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

गेल्या २५ वर्षांपासून कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मंदिर केरळी पद्धतीने सजवून भाविकांसाठी खुले केले जाते. मंदिरात नवग्रह व इतर देवतांची मंदिरेही आहेत. ती वर्षभर दर्शनासाठी खुली असतात. उत्सवासाठी जोरदार तयारी सूरू असून भाविकांच्या सुविधेसाठी गुरूजी, मंडप ,रोषणाईचे काम सुरू आहे.भाविकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थापक अध्यक्ष वासंती अय्यर (मो.नं.९४०५१४३२३५) यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here