समाज परिवर्तनाच्या कार्यात योगदान देण्याचा केला निर्धार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील नेरी नाका चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे स्मरण करत समाज परिवर्तनाच्या कार्यात योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
१ ऑगस्ट १९२० रोजी जन्मलेले अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लोककवी आणि प्रतिभावान लेखक होते. दलित, वंचित, उपेक्षित समाजाच्या व्यथा, संघर्ष आणि आत्मसन्मान यांना त्यांनी आपल्या लेखणीतून वाणी दिली. त्यांच्या साहित्याने समाजप्रबोधन आणि परिवर्तनाची दिशा दिली. म्हणूनच त्यांना ‘लोकशाहीर’ ही उपाधी मिळाली होती.
यांची लाभली उपस्थिती
सोहळ्यात कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, ज्येष्ठ समाजसेवक विजय दहियेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, उमेश माछरेकर, गौतम बागडे, संदीप गारुंगे, पंकज गागडे, संदीप बागडे, राहुल दहियेकर, कार्तिक बाटूंगे, कमल गागडे यांच्यासह पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.