साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी
शहरातील जय गणेश फाउंडेशनतर्फे स्वर्गीय कालिदास विठाेबा नेमाडे यांच्या स्मरणार्थ बहुभाषिक कालिदास काव्यमहाेत्सव यंदा आयाेजित केला आहे. रिंगराेडवरील संताेषी माता हाॅल येथे रविवारी (दि.२६) सायंकाळी ५ वाजेपासून हा महाेत्सव सुरू हाेईल.
काव्यमहाेत्सवाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘आचार्य नंददुलारे वाजपेयी समीक्षा पुरस्कार’ जाहीर झालेले डाॅ. मधू खराटे भूषवतील. निमंत्रित कवींमध्ये प्रा. डाॅ. जे. पी. सुचिक, हामीद भुसावली, हरीषकुमार नागदेव, प्रा. डाॅ. रघुनाथ कश्यप, प्रा. डाॅ. सुधा खराटे, रेल्वे सुरक्षा बलाचे निवृत्त आयुक्त रमेश सरकाटे, प्रा. डाॅ. सुरेश कुसुंबीवाल, हारुन उस्मानी, सीमा भारंबे, जयश्री काळवीट, संध्या भाेळे अशा १२ जणांचा समावेश आहे.
निवेदकाची भूमिका संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डाॅ. गिरीश कुळकर्णी हे पार पाडतील. विशेष अतिथी म्हणून माजी महसूलमंत्री तथा आमदार एकनाथ खडसे, भुसावळ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राधेश्याम लाहाेटी, उपविभागीय पाेलिस अधीक्षक साेमनाथ वाकचाैरे, अखिल भारतीय जैन काॅन्फरन्स नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रेमचंद काेटेचा, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, हेडा ग्रुपचे संचालक मधुकर हेडा यांची उपस्थिती राहील, असे जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, फाउंडेशनचे अध्यक्ष चैत्राम पवार, समन्वयक गणेश फेगडे यांनी सांगितले. आयाेजन व नियाेजन समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करून विविध उपसमित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत.
कवितेचा फुलणार मळा
गावशिवच्या कवींना एकत्रित भेटून त्यांच्या कवितांचा लाभ घेता यावा, सांस्कृतिक चळवळीला ऊर्जा मिळावी, कवितेची गाेडी लागावी या उद्देशाने या काव्यमहाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. शहरातील बहुभाषिक १२ कवी प्रथमच या महाेत्सवात एकाच व्यासपीठावर येत असून भुसावळकरांनी ही माेठी सांस्कृतिक मेजवानी आहे, असे फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सांगितले.