साईमत कजगाव, ता.भडगाव प्रतिनिधी
येथे गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी कजगाव ग्रामपंचायत सदस्यांनी आणि उबाठाच्या शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर येथून जवळील पाचोरा तालुक्यातील खाजोळा येथील दोन ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आणि तांदुळवाडी येथील महिला उपसरपंचांनी राजीनामा दिला आहे. दोन्ही गावांनी लोकप्रतिनिधींना व सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचा ठराव केलेला आहे. तालुक्यासह राज्यात राजीनामाचे सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याने खळबळ उडाली आहे.
खाजोळा येथे विनोद माणिक पाटील आणि ग्रामस्थांच्यावतीने एक दिवसीय आमरण उपोषण करण्यात आले. यावेळी असंख्य ग्रामस्थांसह नागरिक उपस्थित होते. तसेच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजीनामा सत्र सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा आणि शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राजीनामे सत्र सुरू आहे. मराठा समाजाला लवकर आरक्षण द्यावे, अशी मागणी जोरदार होत आहे.
भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील उपसरपंच वंदना दीपक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर पाचोरा तालुक्यातील खाजोळा येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद माणिक पाटील, योगिता भूषण पाटील या दोघांनी आपला पदाचा राजीनामा वरिष्ठांच्या हाती सोपविलेला आहे.