साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
येथे बैलपोळा सण आगळ्यावेगळ्या चालीरीतीने साजरा करण्यात येतो. बस स्थानक भागातील सावता माळी चौकात बोली बोलून ‘पोळा’ फोडण्यात येतो. यावेळी प्रवीण राजेंद्र महाजन यांनी पाच हजार पाचशे रुपये बोलीवर पोळा फोडण्याचा मान घेत पहिला मान मिळविला. याप्रसंगी बोली बोलुन पोळा फोडण्याचा मान मिळविणाऱ्याचा सत्कार करण्यात आला. सरपंच रघुनाथ महाजन यांनी नारळ वाढवत बोली बोलुन फोडल्या जाणाऱ्या बोलीचा शुभारंभ करत बोली लावण्यात आली. यावेळी उपसरपंच शफी मन्यार, माजी सरपंच मनोजकुमार धाडीवाल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
बोलीतून आलेल्या पैशातून सावता माळी चौकातील हनुमान मंदिराची देखभाल, सजावट केली जाते. या आगळ्यावेगळ्या पोळ्याची चर्चा परिसरात असल्याने बोली बोलून फुटणारा पोळा पाहण्यासाठी कजगावसह परिसरातील नागरिक जमा होतात. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भडगाव, कजगाव पोलीस मदत केंद्राचे छबुलाल नागरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.