Dog ​​Attack In Jalgaon : जळगावात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यातील बळी ठरलेल्या ‘बॉबीला’ न्याय द्या

0
61

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी केली मागणी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड ह्या चार वर्षीय बाळाचा गेल्या १ जून रोजी मृत्यू झाला होता. या घटनेला मनपा प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच मयताच्या कुटुंबियांना शासनाने २५ लाखाची आर्थिक मदत द्यावी, अशा मागणीसाठी सोमवारी, ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनआंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बॉबीला न्याय मिळालाच पाहिजे, असे म्हणत आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मोकाट कुत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे, मनपा आयुक्तांवर कारवाई झालीच पाहिजे, मनपा प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या.

नागेश्वर कॉलनीतील अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड या बालकाला मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. नागेश्वर कॉलनी व परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. याबाबत येथील रहिवाशांनी महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे मोर्चा, निवेदन देऊन त्यासंदर्भात तक्रार केली होती. परंतु, गेंड्याच्या कातडीच्या महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्याचा एक लहान मुलगा बळी ठरला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व एकत्र येऊन त्याचा निषेध व्यक्त करुन जनआक्रोश केला आहे. या घंटनेनंतर शासनाच्या कोणताही अधिकाऱ्याने गायकवाड कुटुंबाची भेट घेतली नाही किंवा त्यांचे सांत्वन केले नाही. तसेच त्यांना अद्यापही कोणतीही शासनाकडून मिळालेली नसल्याचे अनिल अडकमोल यांनी सांगितले.

रामानंद नगर पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करु, असे सांगितले होते. परंतु, घटनेला ९ दिवस उलटूनही कोणतीही कारवाई याठिकाणी झालेली दिसून येत नाही. मनपानेही अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. मोकाट कुत्र्यांनी शहरात विविध उपनगरातील जवळपास २५० नागरिकांना चावा घेतला आहे.

पीडित कुटुंबाला २५ लाखांची मदत करावी

पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, त्यांना शासनाने आपत्कालीन परिस्थिती म्हणून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी, उपनगरातील पिसाळलेले कुत्रे, मोकाट कुत्रे यांच्यावर मनपाने तातडीने कारवाई करावी, मनपाने कुत्रे निर्बिजीकरण करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी. यासोबतच मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि मनपा आरोग्य अधिकारी उदय वाघ यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बाब म्हणून पीडित कुटुंबाला २५ लाखांची मदत करावी, अशी मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here