साईमत/ न्यूज नेटवर्क/ पहुर, ता.जामनेर :
खान्देश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या जळगाव -छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफवरील पहूर येथील वाघूर नदीच्या पुलाचे रखडलेले काम पूर्ण होण्यासाठी पहूर येथे चक्क पत्रकार बांधवांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शुक्रवारी, १२ जुलै रोजी तब्बल तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे चारही रस्त्यांवर शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जालना विभागाचे अभियंता संदीप पाटील यांनी पुलाचे काम महिन्याभरात पूर्ण करतो, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर आणि पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना शहर पत्रकार संघटनेतर्फे महामार्ग संदर्भातील विविध आणि प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
पहूर शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कुमावत यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पत्रकार शांताराम बापू लाठे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी १० वाजता वाघूर नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रारंभी याच पूल परिसरात रखडलेल्या पुलामुळे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप स्व.अरुण मोरे, स्व.राहुल पावरे यांच्यासह प्रतिभावंत बालकवयित्री ज्ञानेश्वरी शंकर भामेरे या शाळकरी विद्यार्थिनीच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण कुमावत, माजी अध्यक्ष गणेश पांढरे, रवींद्र घोलप, रवींद्र लाठे, शंकर भामेरे आदी पत्रकार बांधवांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी जामनेर येथील पत्रकार भानुदास चव्हाण, शांताराम झाल्टे, शेंदुर्णी येथील पत्रकार ॲड.देवेंद्र पारळकर, पिंपळगाव येथील पत्रकार संतोष पांढरे यांच्यासह पहुरचे सादिक शेख, कार्याध्यक्ष किरण जाधव, डॉ. संभाजी क्षीरसागर, जयंत जोशी, हरिभाऊ राऊत आदी पत्रकार बांधव रस्त्यावर उतरले होते.
महामार्ग प्रशासनाची लक्तरे टांगली वेशीवर. . .
पहुरचे भूमीपुत्र राज्य शासनाच्या ‘मेरी’ चे सेवानिवृत्त अभियंता विजय पांढरे यांनी आंदोलनात सहभाग नोंदवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची लक्तरेच वेशीवर टांगली आहेत. ते म्हणाले की, ‘ वेळेत काम पूर्ण करता येत नसेल तर तुम्ही अभियंत्यांनी जीव द्यावा, सिंचन घोटाळा जसा समोर आला, तसाच मोठा घोटाळा राष्ट्रीय महामार्गांच्या कामांमध्ये समोर येऊ शकतो. त्यांच्या ज्वलंत भावनांनी वातावरण संतप्त झाले होते.
तासभर महामार्ग रोखला…!
पत्रकार बांधव रस्त्यावर उतरल्याने छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग तब्बल तासभर रोखल्या गेला. शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने सार्वजनिक सामाजिक विषयाबद्दलचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांच्यासह पोलीस प्रशासनाने सहकार्य केले. याप्रसंगी गावातील सामान्य नागरिकांसह काही लोकप्रतिनिधी, शाळकरी विद्यार्थी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
निरपराध नागरिकांच्या जीवाशी खेळ
संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शालेय विद्यार्थी आणि निरपराध नागरिकांच्या जीवाशी आणि भावनांशीच क्रूर खेळ खेळत आहे.तीन जीव गमावलेल्यांमध्ये एक प्रतिभावंत बालकवयित्री ज्ञानेश्वरी शंकर भामेरे ही डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालयाची पाचवीची विद्यार्थिनी होती. एकीकडे सरकार शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवत असताना दुसरीकडे मात्र शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. याकडे शासन आणि प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
…. अन्यथा यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन
पहूर पुलाचा प्रश्न एक महिन्यात सोडवावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण कुमावत यांनी दिला आहे. सामाजिक भावना तीव्र होऊन जनप्रक्षोभ उसळण्यापूर्वीच शासन आणि प्रशासनाने अशा ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधून समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.