साईमत, मुंबई, प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार यांनी खिंडार पाडल्याने राज्यातील राजकारणात मोठे बदल घडून आले होते. पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा जबर हादरा लवकरच बसणार आहे. शरद पवारांच्या जटातीले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह त्यांचे भाचे आमदार प्राजक्त तनपुरे, राजेश टोपे आणि मानसिंग नाईक हे अजित पवार गटात लवकरच प्रवेश करणार असल्याचे समजते.
शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटासोबत घेण्यास तत्कालीन भाजपा नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्या नावावर फुली मारली होती. आता तोच प्रकार कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतीत घडल्याची चर्चा आहे. फडणवीस यांनीच आव्हाड यांच्या प्रवेशाला विरोध केल्यामुळे जयंत पाटील यांच्यासोबतच्या ‘लॉट’मध्ये त्यांचा समावेश झाला नाही. अन्यथा जितेंद्र आव्हाड देखील अतित पवार गोटात येण्यासाठी घुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. जयंत पाटील यांच्यासोबत शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंग नाईक व सुनील भुसारा हेही अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या चार आमदारांचा प्रवेश झाल्यास आव्हाड यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि रोहित पवार हे तीनच आमदार मूळ राष्ट्रवादीमध्ये राहतील, अशी शक्यता आहे. पक्षातील सर्वच नेते अजित पवार गटात गेल्यास रोहित पवार हे देखील शरद पवारांची साथ सोडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जलसिंचन खाते जयंत पाटलांसाठीच राखीव
शिंदे सरकारने खाते वाटप केली असली तरी जलसिंचन खाते अद्याप राखीव आहे. ते कोणालाच दिलेले नाही. ते जयंत पाटील यांच्यासाठीच राखीव असून त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यास जयंत पाटील पुन्हा जलसिंचन मंत्री झाल्यास आश्चर्य वाटायला नको? अशी राजकीय गोटात चर्चा सुरू आहे.