शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी निभावली ‘मास्तरची’ भूमिका
साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील जवखेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे आदर्श गाव जवखेडे येथील ग्रामस्थांनी ग्रामस्तरीय शिक्षक पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा कविता प्रफुल्ल पाटील होत्या.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, ईशस्तवन तसेच स्वागत गीताचे नियोजन केलेले होते. यावेळी शाळेचे उपशिक्षक मुकेश मुरलीधर पाटील, उपशिक्षिका अर्चना मनीलाल बागुल यांना ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच शाळेतील मुख्याध्यापक व इतर शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी मनोगत व्यक्त करुन कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाबद्दल माहितीपर भाषण सादर केले. शिक्षक दिनानिमित्त काही विद्यार्थ्यांनी ‘मास्तरां’ची अर्थात शिक्षकाची भूमिका निभावली होती. त्यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला जिजाबराव पाटील, बाला उपक्रम समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील, चुडामण पाटील, नेताजी पाटील, सुरेश पाटील, प्रफुल्ल पाटील, रवींद्र माळी, दिनकर पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी रत्नप्रभा साळुंखे, अर्चना बागुल, माधवराव ठाकरे, मुकेश पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक छगन पाटील यांनी पुरस्काराचे महत्व व परंपरा विशद केली. सूत्रसंचालन सुनिता पाटील यांनी केले.