धान्य गोणींच्या वजनातील कपातीमुळे जरंडी ग्रामस्थ संतप्त

0
15

सोयगाव : प्रतिनिधी
सोयगाव तहसील धान्य पुरवठा विभागाकडून जरंडी रेशन दुकानाला धान्य पुरवठा करण्यात येतो. मात्र, तहसील धान्य पुरवठा सोयगाव येथून गहू व तांदूळच्या गोण्यामधील धान्य कमी करून रेशन दुकानाला पुरवठा करण्याचा प्रकार जरंडी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या नजरेस आणून दिला आहे. सोयगाव धान्य गोडावूनवरून सर्व तालुक्यातील रेशन दुकानावर गहू आणि तांदुळ पाठविला जातो. गहू आणि तांदुळाची गोणी पन्नास किलोची भरती असतांना ती चक्क 42 किंवा 46 किलोची रेशन दुकानदाराला मिळत आहे. त्यामुळे गावातील रेशनकार्ड धारक धान्यापासून वंचित राहतात. असाच प्रकार जरंडी येथे घडला आहे. सोयगाव धान्य पुरवठा विभागाकडून धान्य गोणींच्या वजनातील कपातीमुळे जरंडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे जरंडीचे ग्रामस्थ रेशनच्या धान्यापासून वंचित राहत आहेत. यामुळे सोयगाव पुरवठा विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
हा प्रकार ग्रामस्थांनी सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर मंगळवारी, 12 सप्टेंबर रोजी दुपारी धान्य पुरवठा विभागाकडून जरंडी रेशन दुकानावर टेम्पोद्वारे गहू व तांदूळ पाठविण्यात आले. यावेळी उपसरपंच संजय पाटील, दिलीप पाटील, मधुकर पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी टेम्पोमधील धान्यांच्या गोण्या त्यांच्या समक्ष वजन करण्यास सांगितल्या. मात्र, टेम्पो चालक व धान्य पुरवठा विभागाकडून आलेल्या कर्मचाऱ्यांनी धान्य रेशन दुकानावर न उतरविताच तेथून आपले पितळ उघडे पडेल, म्हणून धूम ठोकली. सोयगावला धान्य परत घेऊन गेले होते.
चौकशी करुन कारवाईची
निवेदनाद्वारे मागणी
याविषयी जरंडीचे सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, मधुकर पाटील, दिलीप पाटील, अमृत राठोड, भिवा चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी धान्याच्या मापात घोटाळा करणाऱ्या दोषी धान्य पुरवठा अधिकारी व गोडावून किपर यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे लेखी निवेदन तहसीलदार मोहनलाल हरणे यांना दिले आहे. निवेदनावर समस्त जरंडी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ग्रामपंचायतकडून याबाबत निवेदन देण्यात आले
आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here