सावित्रीबाई फुले विद्यालयाचे ‘जलदूत’ अव्वल, लिटल फ्लॉवर्स द्वितीय तर गरुड विद्यालय तृतीय
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनासह नाट्यसंस्कार रुजविण्यासाठी शिक्षण विभागातर्फे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या जलदुतांनी सादर केलेली ‘जलजागराची दिंडी आली हो गावा’ ही नाटिका प्रथम आली. जामनेर येथील लिटिल फ्लॉवर स्कुलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक तर वाकडी येथील भास्करराव खंडेराव गरुड विद्यालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार यांच्या हस्ते तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातून १३ शाळांच्या बालवैज्ञानिक नाट्य कलावंतांनी त्यात सहभाग नोंदविला. जागतिक जलसंकट, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाज, स्वच्छता आणि आरोग्य, आपत्ती व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नाटिका सादर केल्या.
गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू काळे यांच्या हस्ते विजेत्या संघांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. समन्वयक म्हणून रणजित जगताप यांनी काम पाहिले. परीक्षक म्हणून श्रीमती पी. एम. अग्रवाल, पी. आर. वाघ, शंकर भामेरे यांनी काम पाहिले. विज्ञान शिक्षिका वैशाली वंजारी आणि विद्यार्थिनी भक्ती काळभिले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी, विज्ञान शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हास्तरीय नाट्योत्सवासाठी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना विज्ञान शिक्षिका श्रीमती एम. एच. बारी यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वीतेसाठी पंकज रानोटकर, श्रीमती मंगला जवळेकर, संदीप बिडे, जुगलकिशोर ढाकरे, स्वप्नील महाजन, दिनेश मराठे, हेमंत पाटील, अरुण पवार आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन समन्वयक रणजित जगताप तर आभार विषय शिक्षक विजय पाटील यांनी मानले.