तालुक्यात कुटुंब नियोजनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान
साईमत/जामनेर/जामनेर :
राष्ट्रीय लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून जामनेर तालुक्यात कुटुंब नियोजनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा नुकताच प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कुमावद, डॉ.किरण पाटील यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जामनेर तालुक्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर आठवड्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. एक दिवस आधी लाभार्थ्यांना दाखल करून त्याच्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येते. जामनेर तालुक्यात गेल्या वर्षात ८ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, १०५ लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया, १ हजार ८२ स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया अशा १ हजार १९५ शस्त्रक्रिया केल्या. तसेच शस्त्रक्रिया न करताही कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करण्यासंदर्भात लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते.
तालुक्यात २०२४-२०२५ मध्ये ८८ महिलांना प्रसुतीवेळी ‘कॉपर टी’ बसविण्यात आली तर ३५५ महिलांना पाळणा लांबविण्यासाठी कॉपर टी बसविण्यात आली. १३० महिलांना अंतरा इंजेक्शन तर १ हजार ७६ महिलांना गर्भनिरोधक गोळ्या व २ हजार ४८ पुरुषांना निरोधचे वाटप करून आरोग्य विभामार्फत कुटुंब नियोजन केले.
डॉ.राजेश सोनवणे यांनी मानले सर्वांचे आभार
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, माता बालसंगोपन अधिकारी डॉ.रमेश धापते, जामनेर तालुक्याचे नियमित सर्जन डॉ.समाधान वाघ यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय जामनेर, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पहूर, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्यामुळे कामकाज पूर्ण झाले. याबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच यापुढेही भविष्यात असेच कामकाज करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
