विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेने आगार प्रमुखांना दिले निवेदन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
येथील बस स्थानकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोऱ्या आणि गैरप्रकार पाहता आगार परिसरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, दिव्यांगांना एसटी बसमध्ये आरक्षित जागेवर बसण्यासाठी मदत करण्यात यावी, दिव्यांगांसाठी स्थानकावर व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने शुक्रवारी, १३ जून रोजी आगार प्रमुखांना देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पवन माळी, दिव्यांग नवी दिशाचे रवी झाल्टे अपंग एकता संघटनेचे संगीता जोशी, यमुनाबाई, अंबाबाई, जीवन राठोड यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर आगार प्रमुख दिनेश नाईक यांनी संबंधित निवेदनाची योग्य ती दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.
जामनेर बसस्थानकाच्या सुरक्षेबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. तक्रारीनंतरही दखल घेतली जात नसल्याची स्थिती आहे. संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असतानाही बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बसस्थानकात चोऱ्या, तसेच महिलांची छेड काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. नव्याने अर्धवट झालेल्या बसस्थानकात बाहेरून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसस्थानकात उपाययोजना होणे आवश्यक आहे.
उभ्यानेच प्रवास करण्याची दिव्यांगांवर येतेय वेळ
पोलीस कर्मचारीही याकडे लक्ष देत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे रोडरोमिओंवर कोणताच अंकुश राहिलेला नाही. त्यासाठी बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. तसेच एसटी बसमध्ये दिव्यांगांसाठी जागा आरक्षित असते. मात्र, अनेकदा दिव्यांगांना जागेवर बसण्यासाठी जागा मिळत नाही. त्यांना उभ्यानेच प्रवास करण्याची वेळ येते. आरक्षित जागेवर बसण्यासाठी बस वाहक आणि चालक यांनी दिव्यांगांना मदत करावी. तसेच दिव्यांगांना आगारात व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत.